छत्रपती संभाजीनगरातील मुख्य जलवाहिन्यांवर हजारो नळकनेक्शन! मनपा प्रशासनाची डोळेझाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:18 IST2025-04-24T14:17:23+5:302025-04-24T14:18:08+5:30

मोठ्या प्रमाणात पाणी शहरात येत असतानाही नागरिकांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतोय.

Thousands of tap connections on main water channels in Chhatrapati Sambhajinagar! Administration turns a blind eye despite the absence of corporator | छत्रपती संभाजीनगरातील मुख्य जलवाहिन्यांवर हजारो नळकनेक्शन! मनपा प्रशासनाची डोळेझाक

छत्रपती संभाजीनगरातील मुख्य जलवाहिन्यांवर हजारो नळकनेक्शन! मनपा प्रशासनाची डोळेझाक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर नागरिकांनी हजारो नळकनेक्शन घेतले आहे. या अनधिकृत नळकनेक्शन धारकांना आठ ते दहा तास पाणीपुरवठा होतोय. काही वसाहतींमध्ये तर चक्क २४ तासही पाणी उपलब्ध आहे. लोकप्रतिनिधींच्या भीतीने प्रशासन पूर्वी कारवाई करीत नव्हते. आता पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधीही महापालिकेत नाहीत. त्यानंतरही प्रशासन या गंभीर बाबीकडे डोळेझाक करीत आहे. प्रशासनाकडे योग्य नियोजन नसल्याने शहराला पाणी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

शहरात दररोज १४५ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. शहराला दररोज २४० एमएलडी पाण्याची गरज असून, चार दिवसांत ५८० एमएलडी एवढे मुबलक पाणी जमा होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी शहरात येत असतानाही नागरिकांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतोय. पाणीपुरवठ्याचे कोणतेही नियोजन नसल्याने नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतोय. नक्षत्रवाडी येथील एमबीआरवरून शहरातील ३६ जलकुंभांवर पाणीपुरवठा होतो. या जलवाहिन्यांवर अवैध नळकनेक्शन घेता येत नाही. जलकुंभातून विविध वॉर्डांना पाणीपुरवठा करण्यासाठी १००, १५०, २००, ३०० मिमी व्यासापर्यंतच्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. या जलवाहिन्यांची नागरिकांनी अक्षरश: चाळणी केली आहे. त्यामुळे एखाद्या गल्लीतील शेवटच्या घरापर्यंत पाणीच पोहोचत नाही. त्याचप्रमाणे संबंधित वाॅर्डांतील सर्व पाण्याचे टप्पे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मेन लाईनवरील नळकनेक्शन धारकांना पाणीच पाणी मिळते.

४२ नळकनेक्शन कापले
सिल्क मिल कॉलनी येथे बुधवारी मनपाच्या विशेष पथकाने १५० मिमी व्यासाच्या मेन लाईनवरील तब्बल ४२ नळकनेक्शन कापले. रोबोट कॅमेऱ्याच्या मदतीने अगोदर जलवाहिनीवर किती नळकनेक्शन आहेत, याची पाहणी केली. त्यानंतर कारवाई केली. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे दोन रोबोट आहेत.

रोबोटची कारवाई वाढविणार
रोबोटद्वारे दिवसभरातून दोन ठिकाणी पाहणी केली जाते. ही संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. किमान चार ठिकाणी पाहणी करा असे सांगितले आहे. लवकरच रोबोटची संख्याही वाढविली जाणार आहे. जेथे अनधिकृत नळ दिसतील, ते कापले जात आहेत.
-किरण धांडे, कार्यकारी अभियंता मनपा.

Web Title: Thousands of tap connections on main water channels in Chhatrapati Sambhajinagar! Administration turns a blind eye despite the absence of corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.