बोहल्यावरून ठाण्यात

By Admin | Updated: October 26, 2015 00:04 IST2015-10-25T23:31:43+5:302015-10-26T00:04:38+5:30

माजलगाव : लग्नघटिका समीप आली होती. वऱ्हाडी, सगेसोयरे जमले होते. मात्र, बोहल्यावर चढण्याऐवजी नवरदेवासह नातेवाईकांना ठाण्याची हवा खावी लागली.

From Thohla to Thane | बोहल्यावरून ठाण्यात

बोहल्यावरून ठाण्यात


माजलगाव : लग्नघटिका समीप आली होती. वऱ्हाडी, सगेसोयरे जमले होते. मात्र, बोहल्यावर चढण्याऐवजी नवरदेवासह नातेवाईकांना ठाण्याची हवा खावी लागली. लऊळ येथे रविवारी अल्पवयीन मुलीसोबत होणारा विवाह ग्रामसेवकाने रोखला. याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल आहे.
बाबासाहेब भद्रे व महानंदा भद्रे यांनी त्यांच्या मुलीचा विवाह सादोळा येथील नातेवाईकाच्या मुलासोबत ठरवला होता. रविवारचा मुहूर्त ठरला होता. नवरदेवही शनिवारीच हळदीसाठी दाखल झाला होता. मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या विवाहाची घाई आईवडिलांनी केली होती. याची तक्रार पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांना भ्रमणध्वनीवर कळाली. त्यानंतर ग्रामसेवक धनंजय करे यांना कळविण्यात आले. चौकशी केली असता दुपारी १२ वाजता साखरपुडा व दुपारी ४ वाजता विवाह लावणार असल्याचे करे यांना समजले. मुलीची जन्मतारीख ५ जून २००१ असल्याचे निष्पन्न झाले. करे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यास कळविले. नवरदेव-नवरीसह त्यांचे आई-वडील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
नवरीचे वडील बाबासाहेब नागोराव भद्रे, आई महानंदा बाबासाहेब भद्रे, नवरदेवाचे वडील निवृत्ती रंगनाथ साळवे, आई रूक्मीनबाई निवृत्ती साळवे व नवरदेव जितेश निवृत्ती साळवे यांच्याविरूध्द बालविवाह प्रतिबंधक कायदा २०११ नुसार गुन्हा दाखल केला. नवरीची चौकशी करून सोडून दिले. तपास फौजदार सुरेश माळी हे करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: From Thohla to Thane