आली माझ्या घरी ही दिवाळी; दिव्यांच्या उजेडाने न्हाऊन निघाली झोपडी

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 17, 2023 08:07 PM2023-11-17T20:07:56+5:302023-11-17T20:09:29+5:30

दानशूर व्यक्तींनी दिलेल्या पणती, दिव्याने झोपडी उजाळून निघाली, पहिल्यांदा झोपडीसमोर आकाशकंदील लागला व मुलाबाळांनी फराळाचा पोटभर आस्वाद घेतला.

This Diwali has come to my house; A hut bathed in the light of lamps | आली माझ्या घरी ही दिवाळी; दिव्यांच्या उजेडाने न्हाऊन निघाली झोपडी

आली माझ्या घरी ही दिवाळी; दिव्यांच्या उजेडाने न्हाऊन निघाली झोपडी

छत्रपती संभाजीनगर : पोटावर हात असणाऱ्यांना रोजचे दिवस काय, दसरा काय दिवाळी काय सारखेच. दिवसभर कष्टाची पेरणी केल्यावर चूल पेटते. चंद्र व चांदण्याच्या पडलेल्या प्रकाशातच सर्वजण जेवण करतात, कधी कधी उपाशीपोटी झोपी जातात, पण यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी ‘आनंद’ घेऊन आली. दानशूर व्यक्तींनी दिलेल्या पणती, दिव्याने झोपडी उजाळून निघाली, पहिल्यांदा झोपडीसमोर आकाशकंदील लागला व मुलाबाळांनी फराळाचा पोटभर आस्वाद घेतला. कोणी उपाशी राहिले नाही.

झोपडपट्टीत फराळाचा खमंग दरवळला
माळीवाडा परिसरात ८० झोपड्या आहेत. येथे आदिवासी गोंड कुटुंब राहतात. यंदा झोपडपट्टीत दिवाळी आनंद घेऊन आली. रोटरी क्लब ऑफ मेट्रो औरंगाबाद व आस्था जनविकास संस्थेने या गरीब कुटुंबांसाठी चिवडा, चकली, शंकरपाळे, शेव, लाडूचा फराळ आणला होता. फराळाचा खमंग सर्वत्र दरवळला होता. सर्वांनी अंगतपंगत करीत फराळावर ताव मारत आनंद व्यक्त केला.

झोपडीसमोर रांगोळी
जिथे एक वेळस खाण्याचे वांद्ये असतात. तिथे रांगोळी खरेदी करून झोपडीसमोर काढणे दूरच, पण यंदा रोटरी क्लबच्या सदस्यांनी रंगीबेरंगी रांगोळी आणली व प्रत्येक झोपडीसमोर सुंदर रांगोळी काढली होती.

महिलांना साड्या, लहान मुलांना कपडे
माळीवाडा असो वा बीडबायपास परिसरातील झोपडपट्टी. येथे राहणाऱ्या महिलांना भेट म्हणून साड्या, लहान मुलांना रेडिमेड कपडे देण्यात आले. ही भेटवस्तू पाहून सर्व महिला व बालक जाम खूश झाले होते.

आयुष्यातील पहिली दिवाळी
आम्ही आमच्या आयुष्यात अशी पहिली दिवाळी मोठ्या आनंदात साजरी केली. तसेच आम्ही दिवाळी असो दसरा थोडे गोडधोड करीत असतो, पण एवढ्या फराळाच्या प्रकाराचा पहिल्यांदा आस्वाद घेतला.
-लाभार्थी, बीडबायपास झोपडपट्टी.

त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन प्रसन्न झाले
आपण आपल्या कुटुंबात दिवाळी जल्लोषात साजरा करीत असतो, पण झोपडपट्टीत जाऊन तेथील कुटुुंबांसमवेत दिवाळी साजरा करण्याचा आनंद अविस्मरणीय ठरला. दुसऱ्याच्या आनंदातच खरे सुख असते, याची प्रचिती आली. महिला असो वा मूल त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून दरवर्षी असा उपक्रम राबविण्याचा आम्ही सर्वांनी निश्चिय केला, असे रोटरी क्लब ऑफ मेट्रोच्या अध्यक्षा आरती पाटणकर व आस्था जनविकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी सांगितले.

Web Title: This Diwali has come to my house; A hut bathed in the light of lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.