‘मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही’मुळे चोरांचे पलायन; काय आहे चोरी टाळणारे अद्ययावत तंत्रज्ञान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 11:55 IST2025-05-03T11:50:14+5:302025-05-03T11:55:01+5:30
घर मालकाला मोबाइलवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे घरासमोर हालचाली आढळल्याचा अलर्ट आला.

‘मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही’मुळे चोरांचे पलायन; काय आहे चोरी टाळणारे अद्ययावत तंत्रज्ञान?
छत्रपती संभाजीनगर : एका हॉटेल व्यावसायिकाच्या बंगल्यात दोन चोरांनी चोरीचा कट रचला. मंगळवारी रात्री तयारीनिशी त्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. मात्र, व्यावसायिकाने घरात बसवलेल्या अद्ययावत कॅमेऱ्यामुळे त्यांचा प्रवेश झाल्याचे क्षणात उघड झाले आणि रहिवाशांची गर्दी जमत असल्याचे लक्षात येताच चोरांना आल्यामार्गे रिकाम्या हाताने पळावे लागले.
मनीष धारसीभाई परमार (रा. एन ३, सिडको) हे हॉटेल व्यावसायिक आहेत. २९ एप्रिल रोजी ते कुटुंबासह कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. सुरक्षेचा उपाययोजना म्हणून त्यांनी घरासमाेर मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. ते गावाला गेले त्याच रात्री ९ वाजता परमार यांच्या मोबाइलवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे घरासमोर हालचाली आढळल्याचा अलर्ट आला. त्यांनी तपासल्यावर त्यांना घराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून दोन चोरटे आत घुसल्याचे दिसले. परमार मोबाइलवर पाहत असतानाच ते कुलूप तोडण्याच्या प्रयत्नात होते. परमार यांनी शेजारी माजी नगरसेवक प्रमोद राठोड यांना फोन केला. राठोड यांच्यासह अन्य रहिवाशांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. रहिवासी येत असल्याचे लक्षात आल्याने चोरांनी साहित्य टाकून धूम ठोकली. पुंडलिकनगरचे सहायक फौजदार सुनील मस्के तपास करीत आहेत.
काय आहे मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही?
-मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कुठलीही हालचाल होताच रेकॉर्डिंग सुरू करुन वापरकर्त्याला मोबाइलवर संदेश जातो. फक्त हालचालींचे रेकॉर्डिंग केल्यामुळे अनावश्यक व्हिडीओ टाळून स्टोरेजची बचत होते. नाइट व्हिजनमुळे अंधारातही हालचाल दिसते.
-अद्ययावत मोशन डिटेक्टर कॅमेऱ्यात एआयचा वापर आल्याने मनुष्य, प्राण्यांमधला फरक ओळखतो. शिवाय, अन्य कॅमेऱ्यात उंचीवरूनही ‘सेटिंग’ बदलता येते.
-या सेटिंग्ज, सिग्नल जनरेशन व्यवस्थित सेट केल्यानंतर मोबाइलवर योग्य ‘अलर्ट’ मिळतो. अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा अन्य नागरिकांनीदेखील अवलंब करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी केले.