कारमधून चोर आले, सीसीटीव्ही फोडून दुकानातील लाखों रुपयांचा ४०० किलो सुकामेवा लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:53 IST2025-09-03T19:52:01+5:302025-09-03T19:53:27+5:30
देवळाई रोडवर चोरीची घटना; अन्य सामान सोडून केवळ महागडे पदार्थच ढापले

कारमधून चोर आले, सीसीटीव्ही फोडून दुकानातील लाखों रुपयांचा ४०० किलो सुकामेवा लंपास
छत्रपती संभाजीनगर : देवळाई परिसरात कारमधून आलेल्या चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडत किराणा दुकानाचे शटर उचकटून चार लाख रुपयांचा सुकामेवा, खजुराची पाकिटे लंपास केली. सोमवारी उघडकीस आलेल्या घटनेत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुकानमालक मोहम्मद जाकीर ठेकिया ३१ ऑगस्ट रोजी रात्री त्यांचे हे दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी सकाळी दुकानाचे शटर उचकटलेेले होते. १५ हजारांच्या रोख रकमेसह सुकामेवा गायब होता. साताऱ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली.
महागड्या साहित्यावरच डोळा
२० किलो बदाम, ५० किलो काजू, ५० किलो अंजिर, ५० किलो पिस्ता, ३० किलो सुटे बदाम, २० किलो मखाणा, ५० किलो मनुका, १० किलो अक्रोड, २५ किलो काजू, ५० किलो काळ्या मनुका, २५ किलो पेंडखजूर, सिगारेटची पाकिटे व १५ हजार रोख रक्कम चोरीला गेली.
सेंट्रल लॉकही तोडले; कारमधून साहित्य नेले
चोरांची टोळी कारमधून आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. दुकानाच्या शटरला मोठ्या आकाराचे सेंट्रल लॉक असतानाही चोरांनी मोठ्या आकाराच्या पहाऱ्याने (रॉड) मधोमध शटर उचकटवले. दुकान फोडण्यापूर्वी त्यांनी रेकी केल्याचा संशय पोलिसांना आहे. कसोशीने तपास सुरू असल्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले.