बसमध्ये विद्यार्थ्यांची टवाळकी वाढली, शिक्षकांनी बसस्थानक गाठून काढायला लावल्या उठबशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 19:37 IST2024-12-07T19:35:04+5:302024-12-07T19:37:57+5:30
बसमध्ये विद्यार्थ्यांच्या टवाळक्याने सारेच त्रासले; शिक्षकांनी बसस्थानक गाठत शिकवला चांगलाच धडा

बसमध्ये विद्यार्थ्यांची टवाळकी वाढली, शिक्षकांनी बसस्थानक गाठून काढायला लावल्या उठबशा
शिऊर : येथे शिक्षणासाठी बसमधून येताना गाणे म्हणणे, जोराने ओरडणे आदी टवाळकी करीत बस चालक, वाहकांना दमदाटी करणाऱ्या १० ते १५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राध्यापकांनी बसस्थानकात गाठले. त्यानंतर सर्वांसमक्ष त्यांना उठबशा करायला लावत धारेवर धरल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील संत बहिणाबाई महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी परिसरातील वाकला, भादली, बाभूळतेल येथील अनेक विद्यार्थी दररोज एसटी बसने ये-जा करतात. यावेळी याच बसमध्ये याच महाविद्यालयात शिक्षण घेणारे १० ते १५ टवाळखोर विद्यार्थीही बसमध्ये मोठ्याने गाणे म्हणणे, वादावादी करणे, आरडाओरड करणे आदी प्रकार करीत होते. त्यांना समजावून सांगण्यास गेलेल्या एसटी बसच्या चालक आणि वाहकांनाही ते दमदाटी करीत असत. इतर कोणीही त्यांना समजावून सांगत असताना ते समूहाने त्यांच्या अंगावर धावून जात होते.
ही बाब एसटी बसच्या चालक, वाहकांनी वाहतूक नियंत्रक सुनील साळुंके यांच्या माध्यमातून संत बहिणाबाई महाविद्यालयातील प्राचार्य सानप यांना सांगितली. त्यानंतर प्राचार्यांनी महाविद्यालयाचे वर्ग सुटल्यानंतर दोन प्राध्यापकांना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बस स्थानकात पाठवले. यावेळी हे टवाळखोर विद्यार्थी बसस्थानकात होते. त्यांनी उपस्थित १० ते १५ टवाळखोर विद्यार्थ्यांना धारेवर धरले. त्यानंतर या सर्वांना उठबशा करायला लावल्या. तसेच उपस्थित विद्यार्थिनी आणि एसटी बस चालक, वाहकांची माफी मागण्यास सांगितले. तसेच असा प्रकार पुन्हा करणार नाही, याची त्यांच्याकडूून हमी घेतली. त्यानंतर त्यांना सोडून दिले.
अनेक दिवसांपासून धिंगाणा सुरू
संत बहिणाबाई महाविद्यालयातील विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी बसमध्ये गोंधळ घालून चालक, वाहकांना त्रास देत होते. त्यामुळे त्यांच्या महाविद्यालयातील प्राचार्यांना याबाबत माहिती दिली. पालकांनीही आपला पाल्य महाविद्यालयात नियमित जातो का? अभ्यास करतो का? याची पडताळणी केली पाहिजे.
-सुनील साळुंके, वाहतूक नियंत्रक शिऊर