"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:55 IST2025-10-11T15:52:48+5:302025-10-11T15:55:52+5:30
Uddhav Thackeray on Eknath Shinde Ajit Pawar: उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री पद काढून घेण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून ठाकरे सरकारवर बरसले.

"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
Uddhav Thackaray on Mahayuti: विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती रखडली आहे. संख्याबळ, नियम यावर सरकारकडून बोट ठेवले जात असून, यावर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. "दोन-दोन असंवैधानिक पदे तुम्ही नेमत आहात. पहिले त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा. जर विरोधी पक्षनेता आम्हाला देत नसाल, तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत", अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या (युबीटी) वतीने हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्या ठाकरेंनी मांडल्या. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेता नेमायला हवा. तो जाहीर केलेल्या पॅकेजबद्दल अधिकाऱ्यांना विचारू शकतो, पण सरकार विरोधी पक्षनेता नेमायला घाबरत आहे, अशी टीका त्यांनी केली.
...तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो?
उद्धव ठाकरे म्हणाले, "तुमचा आवाज ऐकला जात नाहीये. विरोधी पक्षनेता ते नेमतच नाहीत. का नेमत नाहीत, तर संख्याबळ नाहीये. नाही, तसा नियम नाहीये. मग नियम नसेल, तर मला सांगा की विरोधी पक्षनेता नेमण्यासाठी कायदा, नियम लागत असेल, तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो?", असा सवाल उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला केला.
त्यांना उपमुख्यमंत्री पदाची मस्ती करता येणार नाही -ठाकरे
"दोन-दोन उपमुख्यमंत्री नेमता? संविधानात नसलेली पदे. दोन-दोन असंवैधानिक पदे तुम्ही नेमत आहात. पहिले त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा. जर विरोधी पक्षनेता आम्हाला देत नसाल, तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत. त्यांना उपमुख्यमंत्र्याची मस्ती करता येणार नाही. आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही, हे आज मी जाहीर करतोय. आमचे उपमुख्यमंत्री कुणीही होऊ शकत नाही", अशी टीका उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेत्याच्या रखडलेल्या नियुक्तीवरून केली.
"विरोधी पक्षनेता... अरे तुमच्याकडे एवढे पाशवी बहुमत आहे. केंद्रातील सरकार तुमच्याकडे. पूर्ण वरदहस्त. एवढे मजबूत सरकार आपल्या देशात क्वचित आलं असेल, तरी सुद्धा तुम्ही विरोधी पक्षनेत्याला घाबरता. विरोधी पक्षाला घाबरता. आम्हाला काही फरक पडत नाही, जोपर्यंत आमच्या मागे या मायबाप जनतेचे आशीर्वाद आहे, तोपर्यंत आम्हाला फरक पडणार नाही", असे उद्धव ठाकरे म्हणाले.
विरोधी पक्षनेताच द्यायला तुम्ही तयार नाही
"विरोधी पक्षनेत्याला एक अधिकार असतो. तो अधिकाऱ्यांना बोलवून घेऊ शकतो. विचारू शकतो की, अरे पॅकेज जाहीर केलंय, काय केलंस? तो विरोधी पक्षनेताच तुम्ही द्यायला तयार नाही आहात. का तर संविधानात तशी तरतूद नाही. मग उपमुख्यमंत्री पदाची तरतूद मला दाखवा नाहीतर, तुमचे दोन हाफ, त्यांना हाफच राहुद्या. त्यांना उपमुख्यमंत्री आम्ही मानू शकत नाही", अशी टीका ठाकरेंनी सरकारवर केली.