रस्त्याच्या मधोमध आलेल्या क्रेनवर दुचाकी धडकली; सख्खे भाऊ गंभीर जखमी, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 13:12 IST2022-04-19T13:11:49+5:302022-04-19T13:12:22+5:30
क्रेन चालकाच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रस्त्याच्या मधोमध आलेल्या क्रेनवर दुचाकी धडकली; सख्खे भाऊ गंभीर जखमी, एकाचा मृत्यू
औरंगाबाद : एका दुचाकीवरून कामासाठी तिघे जात असताना त्या रस्त्यावर मधोमध क्रेन आली. या क्रेनला हॉर्न दिल्यानंतरही ती बाजूला न झाल्याने दुचाकी क्रेनवर जाऊन आदळली. यात दोन सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरे दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना बीड बायपास रोडवरील सहारा सिटीजवळ घडली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात क्रेनचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
काद्राबाद (ता. औरंगाबाद) येथील शिवाजी तातेराव नागरे (वय ३६), वैजिनाथ तातेराव नागरे (३०) आणि नामदेव सुदाम गायकवाड हे दुचाकी (एमएच २० एफझेड ३४७०) वरून औरंगाबादकडे येत होते. बीड बायपासवरील सहारा सिटीसमोर येताच रस्त्याच्या मधोमध असलेल्या क्रेनला दुचाकीने बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवला. मात्र, क्रेन (एमएच २० एफजी ३८१४) बाजूला झाली नाही. त्यामुळे दुचाकी क्रेनवर आदळली. या भीषण अपघातात वैजिनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मोठे भाऊ शिवाजी नागरे व नामदेव गायकवाड हे गंभीर जखमी झाले. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना याची कल्पना दिली. तसेच जखमींना खासगी वाहनाद्वारे घाटीत उपचारार्थ दाखल करून नातेवाइकांना माहिती दिली. नामदेव गायकवाड यांच्या तक्रारीवरून क्रेन चालकाच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक घुगे करीत आहेत.
मुलांचे छत्र हरवले
घरातील आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे नागरे बंधू मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे; पण त्यातील एकाला काळाने हिरावून नेले. वैजिनाथ नागरे यांच्या पश्चात आई, पत्नी, आठ व पाच वर्षांच्या दोन मुली व सहा महिन्यांचा मुलगा आहे. या घटनेमुळे तीन मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले आहे.