परिस्थितीला हरवून त्या तिघी जिंकल्या, मनपा शाळेतील विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:16 IST2025-05-14T13:15:06+5:302025-05-14T13:16:26+5:30
पुढे जाऊन आयएएस, आयपीएस होण्याचे आहे स्वप्न

परिस्थितीला हरवून त्या तिघी जिंकल्या, मनपा शाळेतील विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर : हलाखीच्या परिस्थितीत शिकत असलेल्या मिटमिटा येथील मनपा शाळेतील तीन मुलींनी १० वी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्क्यांवर गुण मिळवत आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. यातील एका मुलीची आई लोकांच्या घरी धुणीभांडी करते तर एकीचे आई-वडील दुसऱ्यांच्या शेतात काम करतात. प्रतिकूल परिस्थितीत कुठल्याही सुखसोयी नसताना परिस्थितीला हरवून या तिघी जिंकल्या. पुढे जाऊन तिघींनाही प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे.
मिटमिटा येथील महानगरपालिकेच्या शाळेचा दहावीचा निकाल ९५ टक्के लागला. विशेष म्हणजे या शाळेत मुलींनीच बाजी मारली आहे. गौरी गोलवाडने ९४ तर पूजा सूर्यवंशी आणि आकांक्षा तुपेने ९० टक्के गुण मिळवले. या तिन्ही मुली सामान्य घरातून येतात. कुठलीही खासगी शिकवणी न लावता, महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत, सोयीसुविधा नसतानाही त्यांनी मिळवलेले यश सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरत आहे.
मला खूप शिकायचेय
‘लोकमत’ने या तिघींशी विशेष संवाद साधत त्यांचा संघर्ष जाणून घेतला. यावेळी ९४ टक्के गुण मिळवणाऱ्या गौरी गोलवाडने सांगितले की, तिचे आई-वडील दोघेही दुसऱ्याच्या शेतात काम करतात. कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ यामुळे शेतीतून फार उत्पन्न निघत नाही. मात्र लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या गौरीने त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. ‘ही तर सुरुवात आहे, पुढे अजून खूप शिकायचेय आणि आई-वडिलांना सगळी सुखे द्यायचीत’, असे ती म्हणाली.
आईच्या कष्टांचे चीज
पूजाचे वडील भास्कर सूर्यवंशी हयात नाहीत. वडिलांच्या माघारी आईने कष्टाने तिला आणि भावाला मोठे केले. आईचे कष्ट तिने वाया जाऊ दिले नाहीत. बेताच्या परिस्थितीत शाळा, अभ्यास, आईच्या माघारी घरातील सर्व कामे करत तिने जिद्दीने अभ्यास केला. पूजाच्या आई कल्पना यांनी यावर्षी जास्त घरांची कामे घेतली. झेपत नसतानाही मुलीला अभ्यास करताना काही कमी पडू नये यासाठी त्यांनी कष्ट उपसले. पूजाला पुढे अधिकारी व्हायचेय.
आयपीएस व्हायचेय
आकांक्षा तुपे ही मध्यमवर्गीय आहे. तिचे वडील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. पुढे जाऊन तिला आयपीएस व्हायचे आहे. कितीही अडचणी आल्या तरी या ध्येयावरून आपण मागे हटणार नाही, असा विश्वास तिने व्यक्त केला.
मनपा शाळांमध्ये ७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांवर गुण
महापालिका शाळांमध्ये गुणवत्ता वाढावी, यासाठी प्रशासनाने जोरदार प्रयत्न केले. दहावीच्या निकालात हे परिणामही दिसून आले. मुकुंदवाडी शाळेतील विद्यार्थी यश दाभाडे याने ९५ टक्के गुण मिळविले. मनपा शाळांचा निकाल ७७ टक्के, तर ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांवर गुण घेतले. महानगरपालिकेच्या एकूण १७ माध्यमिक शाळा असून, ८२१ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील ६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मिटमिटा शाळेची गौरी गोलवाड, नारेगाव उर्दू शाळेची बुशरा अन्सारी हिने ९४ टक्के गुण घेतले. किराडपुरा नं. १ या शाळेचा शेख मुजाहिद याने ९१.६० टक्के, मुकुंदवाडी शाळेचा सिद्धार्थ खोले ९०.६० टक्के, पूजा सूर्यवंशी, आकांक्षा तुपे हे मिटमिटा शाळेचे विद्यार्थी ९० घेत गुणवत्ता सिद्ध केली.
सर्व विद्यार्थ्यांचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी कौतुक केले. एका परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून कोणीही खचून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले. माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, उपायुक्त अंकुश पांढरे, नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, अधीक्षक गोविंद बाराबोटे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी गुणवंतांच्या यशाचे कौतुक केले.