फुलंब्रीतील गट १७ मधील बोगसगिरी प्रकरणी तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:52 IST2025-07-09T19:51:41+5:302025-07-09T19:52:19+5:30
फुलंब्रीतील गट १७ मधील प्रकरणावर विधानसभेत लक्षवेधी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कठोर कारवाई

फुलंब्रीतील गट १७ मधील बोगसगिरी प्रकरणी तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित
फुलंब्री : येथील गट १७ मधील एनएच्या प्रकरणात आमदार अनुराधा चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात सगळेच बोगस काम झाल्याचे सांगत तत्कालीन मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल व तलाठी भरत दुतोंडे यांना निलंबित करून दोघांची विभागीय चौकशी करण्याची घोषणा केली.
फुलंब्री येथील गट १७ व गट १७ ए मध्ये बांधकाम व्यावसायिकाने एकर क्षेत्र जमिनीचा एनए करून १५७ लोकांना प्लॉट विक्री केले होते. पण त्याची नोंद नगर पंचायतमध्ये होत नव्हती. या जमिनीचा झालेला एनए हा बोगस असल्याचे कारण देऊन एप्रिल २०२५ मध्ये फुलंब्री पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्लॉट धारक यांनी या संदर्भात आमदार अनुराधा चव्हाण यांनी भेट घेऊन अडचणी मांडल्या.
दरम्यान, या प्लॉट धारकांना न्याय मिळावा यासाठी आमदार चव्हाण यांनी ९ जुले रोजी विधानसभेत लक्षवेधी मांडली. शहरातील गट १७ मध्येची फोड करून १७ ए अस्तित्वात आणला. त्यानंतर बोगस एनए व सातबारा तयार करण्यात आला. घर व प्लॉट देण्याचे स्वप्न दाखवून खाजगी बांधकाम व्यावसायिक व दलालांच्या माध्यामातून अनेक कुटुंबाची घर घेण्याचे स्वप्न उध्वस्त झाले. २०१७ ते २०२५ मधील कालावधील झालेल्या दस्त नोंदणीची व यात सहभागी अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार अनुराधा चव्हाण यांनी केली.
सगळेच फ्रॉड: चंद्रशेखर बावनकुळे
फुलंब्री येथील गट १७ मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश नसताना गटांची फोड केली. त्यानंतर चुकीचा एनए करून बनावट नकाशा तयार केला. तसेच नगर रचना विभागाचे खोटे शिक्के बनविले. या प्रकरणात सर्वच बोगस आहे, अशी कबुली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच तत्कालीन मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल व तलाठी भरत दुतोंडे यांना निलंबित करण्याची घोषणा करत त्यांची विभागीय चौकशी केली जाईल असे जाहीर केले. पण १५७ प्लॉट धारकांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतलं जाईल असे ही त्यांनी सांगितल्याने प्लॉटधारकांना दिलासा मिळाला आहे