जनावरे चारताना पाझर तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला, दोन मित्रांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:02 IST2025-09-01T13:00:47+5:302025-09-01T13:02:37+5:30
शाळेला सुटी असल्याने दोघेही जनावरे चारण्यासाठी घराबाहेर पडले होते

जनावरे चारताना पाझर तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला, दोन मित्रांचा बुडून मृत्यू
खुलताबाद : तालुक्यातील सोनखेडा परिसरातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. अनिकेत रमेश बनकर (वय १६, रा. देवळाणा बुद्रुक, ह. मु. घोडेगाव) व आकाश रमेश गोरे (वय १६, रा. घोडेगाव) मयतांची नावे आहेत.
घोडेगाव येथील सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत असलेले अनिकेत बनकर व आकाश गोरे हे दोघे मित्र शनिवारी दुपारी शाळेला सुटी असल्याने दोन वाजेच्या सुमारास जनावरे चारण्यासाठी घराबाहेर पडले. ३ वाजेच्या सुमारास ते सोनखेडा परिसरातील एका पाझर तलावाच्या जवळ पोहोचले. त्यानंतर त्यांनी तलावाच्या कडेला चप्पल व कपडे काढून पोहण्यासाठी तलावात उतरले; परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले.
दरम्यान, शेजारील शेतातील गुरे चारणाऱ्या व्यक्तीला दोन्ही मुलाचे तलावाच्या कडेला चप्पल व कपडे दिसले. त्यामुळे त्याने याबाबत घोडेगाव व सोनखेडा येथील ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचाही शोध घेतला; परंतु ते काही दिसले नाहीत. पोलिस पाटील यांनी खुलताबाद पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ पांढरे, हेकॉ. उत्तम खटके, आनंद आरसुळे व मुळे यांनी घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत घोडेगाव व सोनखेडा येथील पट्टीचे पोहणाऱ्यांनी तलावात उतरून बराच वेळ शोध घेतल्यानंतर दोघांनाही पाण्याबाहेर काढले. त्यानंतर अनिकेत बनकरला गदाना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर आकाश गोरे यास खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. दोघांनाही डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.