सूर्य आग ओकतोय, दहा मिनिटांत कातडी भाजतेय; ‘सनबर्न’ म्हणजे नेमकं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 20:05 IST2025-04-25T20:04:56+5:302025-04-25T20:05:17+5:30
उन्हाळ्यात दुपारच्या वेळी फक्त १० ते १५ मिनिटे उन्हात राहिल्यासही त्वचेला इजा होऊ शकते.

सूर्य आग ओकतोय, दहा मिनिटांत कातडी भाजतेय; ‘सनबर्न’ म्हणजे नेमकं काय?
छत्रपती संभाजीनगर : शहरातील तापमानाचा पारा ४२ अंशांवर गेला असून, प्रखर उन्हामध्ये अतिनील किरणांचे प्रमाण (यूव्ही इंडेक्स) हे जास्त असते. अतिनील किरणांच्या जास्त काळ संपर्कात आल्यास त्वचेसंबंधी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचेवर लालसरपणा, खाज किंवा जळजळ होणे ही ‘सनबर्न’ची लक्षणे असू शकतात. हे टाळण्यासाठी पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे.
१५ मिनिटांच्या उन्हात सनबर्नचा धोका
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात दुपारच्या वेळी फक्त १० ते १५ मिनिटे उन्हात राहिल्यासही त्वचेला इजा होऊ शकते. विशेषतः ज्या व्यक्तींची त्वचा गोरी आहे, त्यांना अधिक धोका असतो.
उन्हाळ्यात ‘यूव्ही इंडेक्स’ जास्त
उन्हाळ्यात ‘यूव्ही इंडेक्स’ ८ ते ११ च्या दरम्यान पोहोचतो. हा स्तर ‘खूप जास्त धोका’ या श्रेणीत येतो. या काळात शक्यतो थेट सूर्यप्रकाश टाळणे हेच उत्तम.
‘सनबर्न’साठी अतिनील किरणे कारणीभूत
अतिनील किरणांमुळे त्वचेमध्ये जळजळ, सूज, डाग, आणि दीर्घकाळात त्वचेमध्ये वृद्धत्व किंवा त्वचा कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे.
हायड्रेटेड राहण्यासाठी काय कराल?
दुपारी ११ ते ४ वाजेदरम्यान शक्यतो उन्हात जाणे टाळावे. उन्हात जाताना टोपी, दर्जेदार गाॅगल वापरावा. दिवसातून कमीत कमी ८-१० ग्लास पाणी प्यावे. नारळपाणी, ताक, लिंबूपाणी यांचा समावेश करावा. आहारात मोसमी फळांचा समावेश करावा. कॅफिनयुक्त पेये टाळावीत.
दर्जेदार सनस्क्रीन, सुती कपडे वापरा
चांगल्या प्रतीचा सनस्क्रीन वापरावा. घराबाहेर पडण्याच्या २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे. पूर्ण बाह्यांचे आणि हलक्या रंगाचे सुती कपडे घालावेत. स्कार्फ वापरून डोके झाकावे.
पुरेसे पाणी प्यावे
दररोज किमान अडीच ते तीन लिटर पाणी प्यावे. शक्यतो दुपारी बाहेर जाणे टाळावे. उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीन वापरावे. युव्ही प्रोटेक्टेड गाॅगल वापरावा. सनबर्न झाल्यास टॅब वाॅटर, नाॅर्मल सलाइनचा वापर करता येईल. गंभीर सनबर्न असेल तर वेळीच त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डाॅ. कपिल पल्लोड, त्वचारोगतज्ज्ञ