छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लम्पीचा फैलाव थांबता थांबेना; ८४ जनावरांचा बळी, ३२३ वर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 19:16 IST2025-11-14T19:13:51+5:302025-11-14T19:16:20+5:30
पशुपालकांमध्ये या आजाराला प्रतिबंध करण्याबाबत जागृतीही करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लम्पीचा फैलाव थांबता थांबेना; ८४ जनावरांचा बळी, ३२३ वर उपचार
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत लम्पी चर्मरोगाची लागण झालेली असून, आतापर्यंत तब्बल १,९९० जनावरांना बाधा झाली आहे. यापैकी १,५८३ जनावरे औषधोपचाराने बरी झाली असून, ८४ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. लसीकरणानंतरही सध्या ३२३ जनावरांवर उपचार सुरू असून, रोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीची उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
साधारणपणे जिल्ह्यात जुलैपासून आतापर्यंत लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढला. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी यासंदर्भात जिल्ह्यातील गायवर्ग ४ लाख १३ हजार जनावरांना तातडीने लसीकरण व औषधोपचार करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम यांना दिल्या होत्या. त्यानुसार शासनाकडे डॉ. कदम यांनी मागणी केल्यानुसार ४ लाख १९ हजार लसी प्राप्त झाल्या. बूस्टर डोससह १२३ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील बाधित जनावरांसह सर्वच ४ लाख १३ हजार जनावरांंचे लसीकरण करण्यात आले. त्याबरोबरच गोठा निर्जंतुकीकरण मोहीमही राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात एकूण ४० ते ४५ हजार गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. पशुपालकांमध्ये या आजाराला प्रतिबंध करण्याबाबत जागृतीही करण्यात आली.
- ४,१३,००० जिल्ह्यात गायवर्ग पशुधनाच
- ४,१९,००० पुरवठा झालेली लस
- ४,१९,००० बूस्टरसहीत लसीकरण
- १,९९० लम्पी बाधित पशुरुग्ण
- १,५८३ बरे झालेले पशुरुग्ण
- ८४ लम्पीने मृत झालेले पशुधन
- ३२३ उपचार सुरू असलेले पशुरुग्ण