फोडाफोडीचा जि.प. व मनपा निवडणुकांवर परिणाम होणार; संजय शिरसाटांचा भाजपला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 19:47 IST2025-11-26T19:46:22+5:302025-11-26T19:47:09+5:30
अंतर्गत पक्षप्रवेश करू नये, असा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये अलिखित करार झाला आहे. तरीही फुलंब्रीत पैशाच्या मस्तीतून आमचा उमेदवार फोडण्यात आला.

फोडाफोडीचा जि.प. व मनपा निवडणुकांवर परिणाम होणार; संजय शिरसाटांचा भाजपला इशारा
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीनगर पंचायत निवडणुकीतील नगराध्यक्षपदाचा शिंदेसेनेचा उमेदवार आनंदा डोके यांना भाजपने सोमवारी फोडले. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला. काही लोकांच्या पैशांच्या मस्तीतून ही फोडाफोडी करण्यात आली. अशी फोडाफोडी आणि कुरघोडी झाल्यास त्याचे परिणाम जि.प., मनपा निवडणुकीवर होतील, असा इशारा शिंदेसेनेचे आ. संजय शिरसाट यांनी दिला.
शिरसाट म्हणाले की, अंतर्गत पक्षप्रवेश करू नये, असा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये अलिखित करार झाला आहे. तरीही फुलंब्रीत पैशाच्या मस्तीतून आमचा उमेदवार फोडण्यात आला. याची आम्ही गांभीर्याने दखल घेतली असून याचा अहवाल शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांना देणार आहोत. वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आम्ही पाऊल उचलले तर वाईट वाटून घेऊ नका, असा इशारा त्यांनी भाजपला दिला. आम्ही संयम राखला. मात्र संयमाची मर्यादा असते असेही ते म्हणाले.
कोणत्या खुशीतून उमेदवाराने पक्ष बदलला, त्याच्यावर कोणता दबाव होता असा सवाल करत त्यांनी वैजापूर, गंगापूर आणि खुलताबाद नगर परिषद निवडणुकीतही हेच चालू असल्याचा आरोप केला. महायुती म्हणून निवडणूक लढवावी अथवा नाही, याचा निर्णय तिन्ही पक्षाच्या नेत्यांना जिप, मनपात घ्यावा लागेल. प्रचार करायचा की फोडाफोडी हे नेत्यांनी ठरवले पाहिजे असे शिरसाट म्हणाले. लोक पर्याय शोधत असतात,हे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही माहिती आहे. अशा पद्धतीने जर प्रवेश देणार असाल तर आम्ही तुमचे घेतले तर वाईट वाटून घेऊ नका, असे शिरसाटांनी सुनावले.
अजित पवार अर्थमंत्री, परंतु खर्चाबाबतचा निर्णय सामूहिक
अजित पवार यांच्या निधीला काट मारण्याच्या विधानाकडे लक्ष वेधले असता, पवार हे अर्थमंत्री आहेत. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडेही असू द्या, परंतु सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. शिवाय राज्याचा गाडा चालवायचा असल्याने मंत्रिमंडळ सामूहिक निर्णय घेत असते, असे त्यांनी स्पष्ट केले.