मुलगाच जिवावर उठला, संपत्तीसाठी आईवडिलांना हाकलले; पालकांना पोलिसात जाण्याची वेळ

By सुमित डोळे | Published: April 9, 2024 11:15 AM2024-04-09T11:15:29+5:302024-04-09T11:20:02+5:30

चार वर्षांचा छळ असह्य : आईवरच मुलाविरोधात पोलिसांकडे जाण्याची वेळ

The son kick off his parents from home for wealth; Time for the parents to go to the police | मुलगाच जिवावर उठला, संपत्तीसाठी आईवडिलांना हाकलले; पालकांना पोलिसात जाण्याची वेळ

मुलगाच जिवावर उठला, संपत्तीसाठी आईवडिलांना हाकलले; पालकांना पोलिसात जाण्याची वेळ

छत्रपती संभाजीनगर : संपत्तीचा मोह अनावर झालेल्या ३० वर्षीय मुलाने जन्मदात्या आईवडिलांचा अतोनात छळ सुरू केला. दोन दिवसांपूर्वी भरल्या ताटावरून उठवत मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. चार वर्षांचा छळ असह्य झाल्याने आईवर पोटच्या मुलाविरोधात पोलिस ठाण्यात जाण्याची वेळ आली. वृद्धेची आपबीती ऐकल्यानंतर पोलिसांनाही संताप अनावर झाला आणि त्यांनी तत्काळ प्रवीण विश्वनाथ उढाण (वय ३०, रा. शंभूनगर) या मुलावर गुन्हा दाखल केला.

६५ वर्षीय विश्वनाथ व त्यांची पत्नी कांता (६०) या दाम्पत्याने आयुष्यभर काबाडकष्ट करून संसार उभा केला. दोन मुली, मुलाचे लग्न केले. आता आयुष्याच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर सुखाच्या क्षणांची अपेक्षा असताना पोटच्या मुलाला संपत्तीचा मोह अनावर झाला. प्रवीणने घरासह सर्व संपत्ती त्याच्या नावावर करून देण्यासाठी त्यांचा छळ सुरू केला. परंतु, लक्षणे ठीक नसलेल्या प्रवीणच्या नावावर संपत्ती करणे धोक्याचे असल्याची जाण आईला होती. प्रवीणने अंगावर धावून जाणे सुरू केले. सतत वाद घालून त्यांचे औषधपाणी बंद केले. वडिलांना मारहाण करून अनेकदा घराबाहेर काढले. १ एप्रिल रोजी आई-वडील झाल्टा फाटा येथील शेती पाहण्यासाठी गेले होते. २ एप्रिल रोजी ते घरी परतल्यावर प्रवीणने पुन्हा वाद घातला. वडिलांवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मध्यरात्री दोघांना घराबाहेर काढून दिले.

मुलाच्या वागण्यामुळे आई-वडील मुलीकडे गेले. मग शुक्रवारी सायंकाळी जवाहरनगर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बंडगर यांच्याकडे धाव घेतली. आयुष्यात पहिल्यांदा पोलिस ठाण्याची पायरी चढलेल्या कांता थरथर कापत होत्या. बंडगर यांनी त्यांना धीर दिला. मुलाची तक्रार करताना आईला अश्रू अनावर झाले होते. बंडगर यांनी तत्काळ उपनिरीक्षक संजय बनकर यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शनिवारी प्रवीणला ताब्यात घेण्यात आले. प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला नोटीस बजावण्यात आली.

निरीक्षक बंडकर यांच्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक, आई वडिलांचा छळ हा कायद्याने गुन्हा आहे. ज्येष्ठ नागरिक व पालक पालनपोषण, कल्याण अधिनियम २००७ च्या कलम २४ व भादंवि ५०४, ५०६ प्रमाणे यात गुन्हा दाखल होतो. ज्येष्ठांनी त्रास सहन न करता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन बंडगर यांनी केले.

गेल्या १२ महिन्यांमध्ये मुलांचा छळ असह्य झालेल्या १४१ आईवडिलांवर पोलिसांकडे जाण्याची वेळ आली. त्यापैकी ५६ प्रकरणांत तडजोड झाली. २८ प्रकरणे न्यायालयात गेली.
एकूण तक्रारी - १४१
समझोता - ५६
पोलिस ठाण्याकडे वर्ग - १५
ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाकडे वर्ग - १७
न्यायालयाकडे वर्ग - २८
तक्रार निकाली - २३
तक्रार मागे घेतली - २

Web Title: The son kick off his parents from home for wealth; Time for the parents to go to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.