माळीवाड्यात झाडाखाली उभी राहिलेली शाळा...आज बदलतेय गोंड आदिवासींचं भवितव्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:40 IST2025-07-10T17:39:47+5:302025-07-10T17:40:42+5:30
गुरू पौर्णिमा विशेष: झाडाखालीच भरते ६० मुलांची शाळा; निवृत्त शिक्षकांसह डॉक्टर दाम्पत्याचा उपक्रम

माळीवाड्यात झाडाखाली उभी राहिलेली शाळा...आज बदलतेय गोंड आदिवासींचं भवितव्य!
छत्रपती संभाजीनगर : शहरापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावरील माळीवाडा परिसरात वर्गखोल्या, शाळेत प्रवेश नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ वर्षांपूर्वी एका झाडाखालीच शाळा उघडण्यात आली. त्यासाठी एका डॉक्टर दाम्पत्यासह सेवानिवृत्त शिक्षिकांनी पुढाकार घेतला. मागील चार वर्षांमध्ये गोंड आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये अनेक बदल झाले आहेत. अनेकांना वाचता, लिहिता आणि आकडेमोड करता येत आहे.
माळीवाडा परिसरातील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाजवळ ५० पेक्षा अधिक झोपड्या आहेत. या झाेपड्यांमध्ये गोंड आदिवासी लोक राहतात. इथे अनेक लहान-लहान बालकेही राहतात. २०२१ च्या दिवाळी पाडव्यापासून ‘मेक देम स्माइल’ नावाचा ग्रुप तयार करीत ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीरंग देशपांडे व डॉ. अनिता देशपांडे या दाम्पत्यासह सेवानिवृत्त शिक्षिका उज्ज्वला निकाळजे-जाधव, लता मुसळे, वैशाली आठवले, मंगला पैठणे यांनी वस्तीतील ६० विद्यार्थ्यांना एकत्र करीत झाडाखालीच प्रत्येक शनिवार, रविवारी शाळा भरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या बालकांना मराठी भाषाच समजत नव्हती, तर शिकविणाऱ्यांना त्यांची गोंड भाषा कळत नव्हती. त्यामुळे शिकविण्यासाठी यांची टीम पोहोचताच मुले पळून जात. तेव्हा या ग्रुपने मुलांसाठी पोषण आहार देण्यास सुरुवात केला. त्यात खिचडी, मसाला भात, पुरी-भाजीसह प्रत्येक वेळी वेगवेगळे पदार्थ दिले जाऊ लागले. मुलांनी पोटभर जेवण केल्यानंतर त्यांचे वेगवेगळे खेळ घेतले जात होते. त्यातून मुलांना गोडी लागली.
हळूहळू शिक्षकांनीही मुलांना विश्वासात घेऊनच पावले टाकली. या चार वर्षांच्या काळात मुला-मुलींमध्ये अनेक चांगले बदल झाले आहेत. स्वच्छता, शिस्त, नीटनेटकेपणा या गोष्टी मुले शिकली. तीन वर्षांपर्यंतची मुले अंगणवाडीमध्ये आनंदाने गाणी, गोष्टी ऐकत शिकत आहेत. त्याठिकाणी महान व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी साजरी होत आहे. त्याशिवाय मुलांसाठी चित्रकला, विविध खेळ, वेशभूषा अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते, तसेच मुलांना वाचता, लिहिता येऊ लागले आहे, तरीही त्यांच्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात बदल घडविण्याची गरज असल्याचे डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी सांगितले.
कमवले तर खायला मिळते
माळीवाडा येथील गोंड आदिवासी वस्तीवरील नागरिकांनी दररोज काम केले तरच घरातील चूल पेटते. त्यामुळे मुलांना शाळेपेक्षा घरातील कामे महत्त्वाची आहेत. आई-वडील कामाला बाहेर गेल्यानंतर मुली घरकाम करून लहान भावंडांना सांभाळतात. स्वयंपाक, भांडी घासणे, कपडे धुणे यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडतात. मुले गाड्यांना रिफ्लेक्टर लावणे, टोमॅटो काढण्याचे काम करून घरच्यांना हातभार लावतात. शहरातील डॉक्टर दाम्पत्यासह सेवानिवृत्त शिक्षकांच्या उपक्रमासाठी आदित्य हेरलेकर, अब्दुल रहीम, पुण्याचे उदय किरपेकर आदींनी आर्थिक हातभार लावला आहे.