सव्वा सहा कोटींच्या रस्त्याचे दोन महिन्यांतच पितळ उघडे पडले; जेहूर-औराळा मार्गावर खड्डेच खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:05 IST2025-07-01T13:59:51+5:302025-07-01T14:05:01+5:30
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा

सव्वा सहा कोटींच्या रस्त्याचे दोन महिन्यांतच पितळ उघडे पडले; जेहूर-औराळा मार्गावर खड्डेच खड्डे
कन्नड : तालुक्यातील औराळा फाटा ते जेहूर या ७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. या कामासाठी तब्बल ६ कोटी ११ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, केवळ दोन महिन्यांतच रस्ता ठिकठिकाणी उखडल्यामुळे या कामाचे पितळ उघडे पडले असून, कामाच्या गुणवत्तेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळा सुरू होताच या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, डांबरी थर उखडून रस्ता धोकादायक झाला आहे. येत्या काही आठवड्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने या रस्त्याचा उपयोग होण्याऐवजी नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारास तत्काळ ब्लॅकलिस्ट करावे, संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
४० वर्षांनंतर मिळालेले काम वाया?
गेल्या ३०-४० वर्षांपासून या रस्त्याच्या सुधारणा व डांबरीकरणाची मागणी सुरू होती. शेवटी नागरिक, विविध पक्ष आणि स्थानिक संघटनांच्या आंदोलनांनंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी मंजूर झाला होता. त्यामुळे रस्ता दर्जेदार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरल्याचे चित्र समोर आले आहे.
संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती बिकट
कामाच्या गुणवत्तेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणनियंत्रक अधिकाऱ्यांनी तपासणी न करता मंजुरी दिली, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. स्थानिकांनी कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांकडे तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
हजारो नागरिकांचा प्रमुख मार्ग
हा रस्ता म्हणजे जेहूर, जेहूर तांडा, मुंगसापूर, तांदूळवाडी, चिवळी, आडगाव, धोंडुकोडूवाडी, कंळकी, कोळवाडी, कोळवाडी तांडा, निपाणी अशा अनेक गावांसाठी कन्नड व छत्रपती संभाजीनगरशी जोडणारा मुख्य मार्ग आहे. दररोज हजारो नागरिक या रस्त्याचा वापर करत असतात. रस्त्याच्या सध्याच्या दयनीय अवस्थेमुळे दळणवळण अडचणीत आले असून, अपघातांची शक्यता वाढली आहे.
औराळा फाटा ते जेहूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, रस्ता ठिकठिकाणी उखडून गेला आहे. ज्या अभियंत्यांने रस्त्याची पाहणी करून बिले अदा केली, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून नुकसानभरपाई करून घ्यावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
- देविदास राठोड, तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
रस्त्याचे काम योग्य पद्धतीने झाले आहे. तुम्हीही याची खात्री करून घ्यावी, रस्त्यावर एका ठिकाणी शेतकऱ्याची पाइपलाइन लिकेज झाल्याने त्या ठिकाणी खड्डा पडून खडी निघत आहे. मी स्वतः जाऊ काम व्यवस्थित करून घेतो.
- पंकज चौधरी, अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, छत्रपती संभाजीनगर.