'स्टिलबर्थ' चे प्रमाण वाढले! छत्रपती संभाजीनगरात वर्षभरात ७६७ बाळांनी जन्माआधीच डोळे मिटले
By संतोष हिरेमठ | Updated: May 23, 2025 13:45 IST2025-05-23T13:44:01+5:302025-05-23T13:45:55+5:30
मृत शिशू जन्म ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून, आरोग्य व्यवस्थेसाठीही गंभीर बाब मानली जाते.

'स्टिलबर्थ' चे प्रमाण वाढले! छत्रपती संभाजीनगरात वर्षभरात ७६७ बाळांनी जन्माआधीच डोळे मिटले
छत्रपती संभाजीनगर : बाळाच्या आगमनाचा क्षण हा प्रत्येक कुटुंबासाठी उत्कंठा व आनंदाचा क्षण असतो. मात्र, काही जणांसाठी हा क्षण अपार दु:खात बदलून जातो. कारण कधी-कधी जन्माआधीच शिशूंनी डोळे मिटलेले असतात. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळांतर्गत असलेल्या ४ जिल्ह्यांत गेल्या वर्षभरात छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे १२.१८ टक्के मृत शिशूंचा जन्म झाल्याचे समोर आले.
मृत शिशू जन्मास येण्याची आरोग्य विभागात ‘स्टिल बर्थ’ म्हणून नोंद केली जाते. मृत शिशू जन्म ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून, आरोग्य व्यवस्थेसाठीही गंभीर बाब मानली जाते. २०२४-२५ या वर्षात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांतील मृत शिशू जन्मांची नोंद घेतली असता चिंताजनक आकडे समोर आले आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रसूतींचे आणि मृत शिशू जन्माचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चार जिल्ह्यांतील स्थिती (२०२४-२५)
जिल्हा - एकूण प्रसूती - जिवंत जन्म - मृत शिशू जन्म - मृत शिशू जन्म दर
छत्रपती संभाजीनगर- ६२,९४९ - ६२,१८२ - ७६७ - १२.१८ टक्के
जालना-२२,५०७- २२,४२२- ८५ - ३.७८- टक्के
परभणी -१६,४६६ - १६,३६५ -१०१ - ६.१३ टक्के
हिंगोली - १४,४७१- १४,३८३ - ८८ - - ६.०८ टक्के
एकूण - १,१६,३९३- १,१५,३५२ - १,०४१ - ८.९४ टक्के
स्टिलबर्थ म्हणजे काय?
स्टिलबर्थ (मृत शिशू जन्म) म्हणजे गर्भधारणेच्या २० व्या आठवड्यानंतर गर्भातच किंवा प्रसूतीदरम्यान शिशूचा मृत्यू होणे. अशा वेळी मूल जन्माला येते, पण त्यात कोणतीही जीवनचिन्हे (श्वास, हृदयाचे ठोके, हालचाल) नसतात.
नवजात शिशूच्या मृत्यूची काही कारणे
- गुंतागुंतीच्या अवस्थेत प्रसूतीसाठी येणे.
- मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार.
- गरोदर मातेला ॲनिमिया.
- गरोदर मातांच्या आहाराकडे दुर्लक्ष.
- औषधोपचारांकडे दुर्लक्ष.
- आरोग्य केंद्रांऐवजी घरगुती उपचार.
- नियमित तपासणी टाळून थेट प्रसूतीसाठी जाणे.
- सोनोग्राफीअभावी गर्भातील स्थिती न समजणे.
- नवजात शिशूला जंतुसंसर्ग.
- नवजात शिशूचे वजन कमी असणे.
रेफरचे प्रमाण अधिक
छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आहे. याठिकाणी जिल्ह्यातून, जिल्ह्याबाहेरून ‘रेफर’ रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात ‘स्टिल बर्थ’चे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर मातांनी नियमितपणे तपासणी केली पाहिजे. आरोग्य विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न केला जातो. ॲनिमिया दूर होण्यासाठी आयर्नच्या गोळ्या दिल्या जातात.
- डाॅ. कांचन वानेरे, आरोग्य उपसंचालक