भाजपच्या छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू; इच्छुकांची कराडांच्या घरी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:58 IST2025-04-28T13:58:19+5:302025-04-28T13:58:57+5:30
एक महिला, एक खुला व एक एस.सी. प्रवर्गातील पदाधिकारी अशी तीन नावे कोअर कमिटीला प्रदेश समितीकडे पाठवावी लागतील.

भाजपच्या छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू; इच्छुकांची कराडांच्या घरी गर्दी
छत्रपती संभाजीनगर : भाजपमध्ये शहराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पहिली फळी आणि दुसरी फळी अशी स्पर्धा या पदासाठी आहे. शहराध्यक्ष हा पक्षासाठी पूर्ण वेळ देणारा व सर्वांना सोबत घेऊन चालणारा असावा. त्यामुळे स्थानिक कोअर कमिटीने शिफारस करताना ही बाब लक्षात ठेवून नावे पाठवावीत. असे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सूचित केले. एक महिला, एक खुला व एक एस.सी. प्रवर्गातील पदाधिकारी अशी तीन नावे कोअर कमिटीला प्रदेश समितीकडे पाठवावी लागतील. शनिवारी चव्हाण यांनी आयएमए हॉलमध्ये संघटनात्मक बैठक घेत २८ एप्रिलपर्यंत बस्ती चलो अभियान राबविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
चव्हाण शुक्रवारी रात्री शहरात आले होते. जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये ते मुक्कामी होते. यावेळी खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर यांच्यासह शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांनी चव्हाण यांच्यासोबत फोटोसेशन केले. त्यानंतर रविवारी खा. डॉ. कराड यांच्या निवासस्थानी इच्छुकांची गर्दी होती. सध्या पक्षात स्थानिक आजी-माजी मंत्र्यांचा एक गट, नव्याने पक्षात आलेले, ये-जा करणारे, परंतु मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेल्यांचा एक गट तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा एक असे तीन गट आहेत. दरम्यान गेल्या आठवड्यात भाजपने शहर व जिल्ह्यातील मंडळ अधिकाऱ्यांची निवड केली. यात काही मंडळ अधिकारी इतर पक्षांतून आलेले असताना त्यांना संधी देण्यात आल्याने खदखद वाढली आहे.
चर्चेत असलेली नावे....
बापू घडमोडे, समीर राजूरकर, हर्षवर्धन कराड, दिलीप थोरात, जालिंदर शेंडगे, शिवाजी दांडगे, किरण पाटील, दीपक ढाकणे, राजगौरव वानखेडे यांची नावे शहराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. यातील काही जणांनी पक्षाचे कार्याध्यक्ष व आगामी काळात होणारे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना साकडेदेखील घातले आहे. काही जणांनी मुंबईवारी करून वरिष्ठांकडे ‘लॉबिंग’ही केले आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधींना संधी मिळणार नाही, अशी पक्षाची भूमिका आहे. तसेच वयाची मर्यादादेखील पक्षाने आणल्याने आ. केणेकर यांचे नाव मागे पडले.
बोराळकर यांनाच पुन्हा संधी?
पक्षातील पहिल्या फळीने मात्र विद्यमान शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनाच पसंती देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. वरिष्ठ स्तरावरदेखील त्यांचे नाव आघाडीवर आहे. महापालिका निवडणुका होतील, तोपर्यंत बोराळकरच अध्यक्ष राहतील, यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांची एक गोपनीय बैठक या आठवड्यात होईल, असे सूत्रांनी सांगितले.