रक्षकच झाले भक्षक! औरंगाबादेत मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाचे महिलांसोबत अश्लील वर्तन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 17:59 IST2023-02-17T17:13:10+5:302023-02-17T17:59:26+5:30
याप्रकरणी महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

रक्षकच झाले भक्षक! औरंगाबादेत मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाचे महिलांसोबत अश्लील वर्तन
औरंगाबाद: एका पोलिस उपनिरीक्षकाने मद्यधुंद अवस्थेत राहत्या कॉलनीतीलच महिलांशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, महिलांच्या तक्रारीवरून पोलिस उपनिरीक्षक अनिल बोडले विरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद शहर पोलिस दलातील सहाय्यक आयुक्त विशाल ढुमेने महिलेशी गैरवर्तन केल्याचे प्रकरण महिनाभरापूर्वीच घडले होते. दरम्यान, गुरुवारी अनिल बोडले या पोलिस उपनिरीक्षकाने मद्यधुंद अवस्थेत कॉलनीतील महिलांसोबत अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल बोडेले हे जवाहरनगर परिसरातील मयूरबन कॉलनीत राहतात.
बोडले यांनी मद्यधुंद अवस्थेत या परिसरातील काही महिलांची छेड काढली. त्यांच्याशी महिलांच्या घराच्या भिंतीवर चेंडू मारत ते अश्लील वर्तन करत होते. अश्लील नजरेने पाहून अनेक महिलांना त्यांनी त्रास दिला. या महिलांनी एकत्र येऊन अनिल बोडेलेंना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता बोडेले यांनी महिलांना शिविगाळ करत धमकी दिली. तसेच मद्यधुंद अवस्थेतच महिलांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचा देखील आरोप आहे. या सर्व प्रकाराने संतप्त झालेल्या महिलांनी आपला मोर्चा जवाहरनगर पोलिस ठाण्याकडे वळवला. अनिल बोडेलेंवर कारवाई करा, या मागणीसाठी महिलांनी तक्रार देत रात्री उशिरापर्यंत जवाहरनगर पोलिस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला. अखेर बोडले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.