पोलीस दलाचा सच्चा साथीदार हरपला! २८ गंभीर गुन्ह्यांची उकल करणारी श्वान 'खुशी'चे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:10 IST2025-09-09T13:05:26+5:302025-09-09T13:10:02+5:30
अठ्ठावीस गुन्ह्यांची उकल करणाऱ्या श्वान खुशीला अखेरचा निरोप

पोलीस दलाचा सच्चा साथीदार हरपला! २८ गंभीर गुन्ह्यांची उकल करणारी श्वान 'खुशी'चे निधन
छत्रपती संभाजीनगर: हत्या, दरोडा, आणि घरफोडीसारख्या २८ गंभीर गुन्ह्यांची यशस्वीपणे उकल करून छत्रपती संभाजीनगरपोलिसांना मदत करणारी श्वान 'खुशी' हिचे रविवारी निधन झाले. डॉबरमॅन जातीच्या या प्रशिक्षित श्वानाला पोलिसांनी भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप दिला, ज्यामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
गुन्हे उघडकीस आणण्यात निपुण
२० नोव्हेंबर २०१३ रोजी जन्मलेल्या खुशीला पुण्यातील श्वान प्रशिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. मार्च २०१५ मध्ये, ती जिल्हा पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथकात सामील झाली. केवळ बॉम्ब शोधण्यातच नाही, तर गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींचा माग काढणे आणि पुरावे गोळा करणे यात ती निष्णात होती. तिच्या सेवा काळात तिने अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना महत्त्वपूर्ण मदत केली. तिच्या याच महत्त्वपूर्ण योगदानामुळे तिला अनेकदा सन्मानितही करण्यात आले होते.
सेवाकाळातच निधन
जवळपास दहा वर्षे पोलीस दलात सेवा दिल्यानंतर, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच खुशीने जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनामुळे पोलीस दलातील प्रत्येकाने दुःख व्यक्त केले. तिच्या निधनानंतर पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, आणि उपअधीक्षक गौतम पातारे यांनी तिला श्रद्धांजली वाहिली. हँडलर पी. आर. मिसार आणि व्ही. एस. तळेकर यांनी गेली दहा वर्षे तिची काळजी घेतली होती. एका सहकाऱ्याला गमावल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
सेवा, निष्ठा आणि शौर्याचे प्रतीक
श्वान 'खुशी' ही केवळ एक पोलीस श्वान नव्हती, तर ती पोलीस दलातील एक निष्ठावान सदस्य होती. तिने दिलेल्या योगदानाबद्दल पोलीस दल कायमच तिची आठवण ठेवेल. तिच्या निधनाने पोलीस दलाला निश्चितच मोठा तोटा झाला आहे.