पंचनामे झाले, प्रस्तावही गेला...दिवाळी संपली, पण शेतकऱ्यांसाठीची मदत कुठंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:08 IST2025-10-30T19:07:34+5:302025-10-30T19:08:52+5:30
पैठण तालुक्यातील बळीराजा हवालदिल

पंचनामे झाले, प्रस्तावही गेला...दिवाळी संपली, पण शेतकऱ्यांसाठीची मदत कुठंय?
- अनिलकुमार मेहेत्रे
पाचोड : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बळीराजाचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्य शासनाने, सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची केलेली घोषणा फोल ठरली आहे. तहसील प्रशासनाने बांधावर जाऊन पंचनामे पूर्ण करून शासनाकडे प्रस्ताव पाठवला असतानाही, दिवाळी संपली तरी पैठण तालुक्यातील एकाही शेतकऱ्याच्या खात्यात नुकसानभरपाईचा एक रुपयाही जमा झालेला नाही.
पैठण तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सलग पंधरा दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आणि त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकारी यांचा समावेश असलेल्या त्रीसदस्यीय कमिटीच्या माध्यमातून हे पंचनामे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूर्ण करण्यात आले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदतीसाठीचा सविस्तर प्रस्ताव तातडीने शासन दरबारी पाठविण्यात आला. नुकसानीच्या पाहणीनंतर शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची घोषणा केली होती, तसेच दिवाळीपूर्वी ही मदत थेट खात्यात जमा होईल, अशी आशा निर्माण केली होती; परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याने त्यांची आशा फोल ठरली आहे.
पुन्हा अवकाळी पावसाचा फटका
शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असतानाच, गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस तालुक्यात हजेरी लावत आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील राहिलेल्या-साहिल्या पिकांचेही मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत
तालुक्यातील ९६ हजार शेतकऱ्यांच्या शेतातील ८८ हजार २४४ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून, तालुका प्रशासनाने शासनाकडे १०१ कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होणार आहे.
-ज्योती पवार, तहसीलदार
खात्यात एक रुपयाही आला नाही
पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी बांधावर येऊन पंचनामे केल्यानंतर मदतीचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे पाठविला आहे; पण आमच्या खात्यात आजपर्यंत एक रुपयाही जमा झालेला नाही.
-सुभाष गोजरे, शेतकरी, वडजी
कर्ज कसे फेडायचे?
मुसळधार पावसामुळे माझ्या शेतातील कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाले. तहसील प्रशासनाने तातडीने पंचनामे केले; पण अजूनही नुकसानभरपाईची रक्कम खात्यावर न आल्यामुळे आता कर्ज कसे फेडायचे, अशी चिंता पडली आहे.
-अंबादास थोटे, शेतकरी, ज्ञानेश्वरवाडी