महापालिका पदाधिकाऱ्यांची दालने पाच वर्षांपासून कुलूपबंद! आता डागडुजीवर होणार लाखोंचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 17:30 IST2025-05-09T17:30:27+5:302025-05-09T17:30:41+5:30

मागील पाच वर्षांपासून सर्वसाधारण सभेच्या सभागृहाचे काम सुरू असून, ते अजूनही अपूर्ण असल्याचे दिसून येते.

The offices of municipal officials have been locked for five years! Now lakhs will be spent on repairs | महापालिका पदाधिकाऱ्यांची दालने पाच वर्षांपासून कुलूपबंद! आता डागडुजीवर होणार लाखोंचा खर्च

महापालिका पदाधिकाऱ्यांची दालने पाच वर्षांपासून कुलूपबंद! आता डागडुजीवर होणार लाखोंचा खर्च

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची दालने मागील पाच वर्षांपासून कुलूपबंद आहेत. दालनांचा वापर नसल्याचे त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे लवकरच प्रशासनाकडून दालनांची डागडुजी सुरू केली जाणार आहे. यावर लाखो रुपये खर्च अपेक्षित आहे. मागील पाच वर्षांपासून सर्वसाधारण सभेच्या सभागृहाचे काम सुरू असून, ते अजूनही अपूर्ण असल्याचे दिसून येते.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ४ महिन्यांत घेण्याचे आदेश दिले. दिवाळीपूर्वी किंवा नंतर महापालिका निवडणूक होईल, असा अंदाज लावण्यात येतोय. शहरातील मतदार आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी महापालिकेत पाठवतील. त्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता या पाच महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची निवड होईल. एप्रिल २०२० पासून महापालिकेत ‘कारभारी’ नसल्याने त्यांची दालनेही कुलूपबंद होती. स्थायी समिती सभापती, उपमहापौरांच्या दालनांचा वापर अधिकारी, कर्मचारी कोरोना संसर्गापासून करीत आहेत. सभापतींच्या कक्षात कोरोना वॉररूम तयार करण्यात आली होती. पत्रकारांनी बुधवारी पदाधिकाऱ्यांच्या कक्षांची पाहणी केली असता महापाैर, विरोधीक्षनेता, सभागृहनेत्यांची दालने कुलूपबंद होती. त्यांची अवस्था वाईट झाली आहे.

७९ लाखांचे अंदाजपत्रक
मनपातील पाच पदाधिकाऱ्यांच्या दालनांची डागडुजी करण्यासाठी ७९ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली. लवकरच काम सुरू होईल. ज्या कामांना विलंब होणार ती कामे अगोदर केली जातील. पदाधिकारी येण्यापूर्वी कलर, वॉलपेपर आदी छोटी कामे शिल्लक ठेवली जातील, अशी माहिती उपअभियंता संजय चामले यांनी दिली.

सभागृहावर ४ कोटी खर्च
सर्वसाधारण सभेच्या सभागृहाचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. या कामावर जवळपास ४ कोटींहून अधिकची रक्कम खर्च केल्याची माहिती समोर आली. आसन व्यवस्था, विद्युत, साऊंड सिस्टीम आदी सर्वच यंत्रणा बदलण्यात आली. सभागृहाच्या बाजूला नगरसेवकांना जेवणासाठी सभामंडपही तयार करण्यात आले.

दीडशे वाहने कुठे उभी राहणार
निवडून आलेले लोकप्रतिनिधी सर्वसाधारण सभेला आल्यावर त्यांना वाहने उभी करण्यासाठी मुख्यालयात जागा अपुरी पडणार आहे. मुख्यालयात प्रवेशद्वाराच्या बाजूला जवळपास २ हजार चौरस फूट जागेवर शौचालय बांधून ठेवण्याचा प्रताप प्रशासनाने केला आहे. ११५ किंवा १२६ नगरसेवक, २५ पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची वाहने कुठे उभी राहणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

Web Title: The offices of municipal officials have been locked for five years! Now lakhs will be spent on repairs