गल्लीत भरधाव वाहन चालविणाऱ्याला समज देणाऱ्याचा खून, तिघांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 14:33 IST2023-03-18T14:26:17+5:302023-03-18T14:33:41+5:30
‘वाहन हळू चालव, एखाद्याला मारतो काय?’ अशी समज दिल्यावरून झाले होते वाद

गल्लीत भरधाव वाहन चालविणाऱ्याला समज देणाऱ्याचा खून, तिघांना जन्मठेप
छत्रपती संभाजीनगर : गल्लीत भरधाव वाहन चालविणाऱ्याला समज दिल्याच्या रागातून काठीने डोके फोडून त्याचा खून केल्याच्या आरोपाखाली तिघा आरोपींना सत्र न्यायाधीश एस. एम. कोचे यांनी जन्मठेप आणि प्रत्येकी २० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास या आरोपींना एक वर्ष जादा सश्रम कारावास भोगावा लागेल, असे आदेशात म्हटले आहे.
शेख मोहम्मद सोफियान (रा. अजिंठा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २६ ऑगस्ट २०२१ रोजी त्याचे वडील शेख मोहम्मद शफियोद्दीन शेख अब्दुल रहेमान हे गल्लीत त्यांच्या घरासमोर उभे होते. त्यावेळी शेख सादिक उर्फ मुन्ना जान मोहम्मद याने भरधाव वेगाने त्याची ओमनी कार शेख मोहम्मद यांच्या अंगावर घातली. मात्र, ते बाजूला सरकले. ‘वाहन हळू चालव, एखाद्याला मारतो काय?’ अशी समज दिल्यावरून ‘तू पुढे ये, तुला उडवतो’ असे सादिकने उत्तर दिले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. नातेवाइकांनी त्यांचे भांडण सोडवले.
त्यानंतर १५-२० मिनिटांनी सादिक त्याचा भाऊ जावेद शेख आणि अथर उर्फ अत्तू बेग जाफर बेग या दोघांना घेऊन पुन्हा आला. तिघांनी शेख मोहम्मद यांच्यावर हल्ला केला. उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला आणत असताना वाटेतच शेख मोहम्मद मरण पावले. अजिंठा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अजित डी. विसपुते यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.
मुख्य आरोपी इतकेच सहआरोपीही जबाबदार
अतिरिक्त लोकअभियोक्ता शरद बी. बांगर यांनी ७ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. प्रत्यक्षदर्शी आणि पंच साक्षीदारांच्या जबाबानुसार सहआरोपी जावेद आणि अथर यांनी मयताला दांड्याने मारहाण केली नाही. तरी ते सुद्धा दांड्याने मारहाण करणाऱ्या सादिकइतकेच जबाबदार असल्यामुळे त्यांना सुद्धा जन्मठेप ठोठावण्यात यावी अशी आग्रही मागणी बांगर यांनी केली. मुख्य आरोपी इतकेच सहआरोपीही जबाबदार ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली.