महापालिका आता थांबणार नाही; जालना रोडनंतर सर्व मुख्य रस्ते ६० मीटर रुंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 19:48 IST2025-06-28T19:47:59+5:302025-06-28T19:48:25+5:30

६० मीटर रस्ता रुंद केल्यावर दोन्ही बाजूंनी पथदिवे बसविले जातील. रस्त्याची रुंदी लिहिली जाणार असून, जेणेकरून कोणी अतिक्रमण करणार नाही.

The municipal corporation will not stop now; after Jalna Road, the main roads will be 60 meters wider by demolishing encroachments | महापालिका आता थांबणार नाही; जालना रोडनंतर सर्व मुख्य रस्ते ६० मीटर रुंद होणार

महापालिका आता थांबणार नाही; जालना रोडनंतर सर्व मुख्य रस्ते ६० मीटर रुंद होणार

छत्रपती संभाजीनगर : शहरातील चार मुख्य रस्ते महापालिका कोणत्याही परिस्थितीत मोकळे करणारच आहे. जालना रोड म्हणजे महावीर चौक ते केम्ब्रिज या पहिल्या टप्प्यात रुंदीकरणाचे काम सुरू आहे. महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी, वसंतराव नाईक चौक ते हर्सूल गाव, महावीर चौक ते दौलताबाद टी पॉइंटपर्यंतचे रस्ते ६० मीटर रुंद केले जातील. रस्त्यात बाधित होणाऱ्यांनी स्वत:हून आपल्या मालमत्ता काढून घ्याव्यात. महापालिकेवर कारवाईची वेळ आणू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

शहरात नवीन नवीन कंपन्या येत आहेत. लवकरच मुबलक प्रमाणात पाणीही मिळणार आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या बरीच वाढेल. भविष्याच्या दृष्टीने रस्ते रुंद होणे खूपच आवश्यक आहे. मुकुंदवाडीत खून झाल्यानंतर कारवाई सुरू केली. मालमत्ताधारक न्यायालयात गेले. आता न्यायालयाच्या आदेशानुसारच पुढील कारवाई होईल. पावसाळ्यात कारवाई करता येत नाही, असा आरोप राजकीय मंडळींकडून होतोय, यावर जी. श्रीकांत म्हणाले, रस्त्यात एखादे घर असेल तर ते काढता येते. बहुतांश मालमत्ता या व्यावसायिकच आहेत. जालना रोडसह अन्य ठिकाणी नागरिक स्वत:हून मालमत्ता काढून घेत आहेत. त्यांनी काढले नाही तर मनपा काढणारच आहे.

६० मीटरवर पथदिवे
६० मीटर रस्ता रुंद केल्यावर दोन्ही बाजूंनी पथदिवे बसविले जातील. रस्त्याची रुंदी लिहिली जाणार असून, जेणेकरून कोणी अतिक्रमण करणार नाही. बीड बायपासवर सिमेंटचे पोल बसविण्यात येत आहेत. लवकरच महापालिका सर्व्हिस रोड करणार आहे. गुंठेवारीचे २० कोटी मनपाकडे आहेत, रस्त्यांसाठी ही रक्कम खर्च होईल.

रस्त्यांवर मार्किंग होईल.
शहरातील रस्ते रुंद करण्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांवर एकूण ५० अभियंते नियुक्त आहेत. मालमत्ताधारकांना नोटिसा देण्यास त्यांना सांगितले आहे. भूमी अभिलेख विभागालाही काही ठिकाणी सोबत घेऊन रस्त्यांवर मार्किंग होईल.

७ दिवसांत टीडीआर मिळेल
६० मीटरच्या आत एखाद्याच्या मालकीची जमीन खुली असेल तर त्याला ७ दिवसांत टीडीआर मिळेल. बांधकाम केले असेल, त्यांना टीडीआर मिळणार नाही, त्यांनी उर्वरित जागेची गुंठेवारी करून घ्यावी. महापालिकेची मुकुंदवाडी स्मशानभूमीसुद्धा मागे घेत आहोत. पुतळा गार्डनमध्ये शिफ्ट केला जाईल. धार्मिक स्थळ काढले जाईल.

चंपा चौक ते जालना रोड
चंपाचौक ते जालना रोड हा रस्ताही तयार केला जाईल. लोकप्रतिनिधींची मागणी आहे. देवळाई चौक ते झाल्टा फाट्यापर्यंत रुंदीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

Web Title: The municipal corporation will not stop now; after Jalna Road, the main roads will be 60 meters wider by demolishing encroachments