अवैध धंद्यामुळे नेहमीच पोलिसांच्या संपर्कात होते बजाजनगर दरोड्याचे सूत्रधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:25 IST2025-05-28T14:24:46+5:302025-05-28T14:25:47+5:30
लॉजिंग वेश्याव्यवसायासाठी परिसरात कुख्यात, दीड हजार रुपयांत चालायचा देहव्यापार; २०१० मध्ये शहरात आलेल्या हाजबेने १५ वर्षांत बसवला अवैध व्यवसायात जम

अवैध धंद्यामुळे नेहमीच पोलिसांच्या संपर्कात होते बजाजनगर दरोड्याचे सूत्रधार
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर दरोड्याचे मुख्य सूत्रधार अमोल खोतकर व योगेश सुभाष हाजबे या दोघांनी परिसरात राजरोस वेश्याव्यवसाय, अवैध दारूविक्री सुरू केली होती. या माध्यमातून हाजबेची एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांसोबत ‘ओळख’देखील होती. एन्काउंटर झालेल्या या लॉजसमोरील संपूर्ण मैदानावर कंडोम व दारूच्या बाटल्यांचा अक्षरश: खच साचला होता. याच अवैध धंद्यांमुळे डेअरिंग वाढून त्यांनी दरोड्यापर्यंत मजल मारली.
मूळ बुलढाणा जिल्ह्यातील असलेला हाजबे २००९ मध्ये मजूर म्हणून वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये आला होता. तेव्हापासून तो अवैध व्यावसायिकांच्या संपर्कात आला. २०१४ मध्ये त्याच्यावर बुलढाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा पहिला गुन्हा दाखल झाला. २०१६ मध्ये त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्याचदरम्यान तो वाळूजमध्ये अवैध दारूविक्रीत उतरला. त्याने साजापूरमधील साई लॉजिंग अँड गार्डन भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतले होते. औद्योगिक वसाहतीत इंडस्ट्रीच्या प्लॉटवर त्याने अवैधरीत्या लॉजिंग उघडून देहविक्री सुरू केली होती.
परराज्यातील मुली
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाजबेच्या या लॉजवर अनेकदा परराज्यातील मुली देहविक्रीसाठी आणल्या जात होत्या. त्याच व्यवसायातून त्याची लाखोंची कमाई सुरू झाली. गुन्हे दाखल होत असतानाच त्याची कारागृहात अमोलसोबत ओळख झाली. देहविक्रीमुळे अमाेलचे सातत्याने त्याच्या हॉटेलवर जाणे होत होते. तेथून त्यांची मैत्री झाली.
एमआयडीसी वाळुज पोलिसांची डोळेझाक
एमआयडीसी वाळुज पोलिसांकडून परिसरातील अशा अनेक अवैध धंद्यांची पाठराखण केली जाते. हाजबेच्या लॉजवर देहविक्री चालते, ही बाब एमआयडीसी वाळूज पोलिसांसह सर्वांना माहीत होती. मात्र त्यांनी डोळेझाक केली. त्याची परिणती ही अशी झाली.