पावसाचा जोर वाढला, मराठवाड्यातील धरणे भरू लागली, लघुप्रकल्पांनाही लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:05 IST2025-08-19T16:58:06+5:302025-08-19T17:05:01+5:30
मराठवाड्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

पावसाचा जोर वाढला, मराठवाड्यातील धरणे भरू लागली, लघुप्रकल्पांनाही लाभ
छत्रपती संभाजीनगर : चार दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने प्रमुख मोठ्या प्रकल्पांत ९० टक्क्यांवर जलसाठा जमला आहे. निम्म्यावर मध्यम आणि लघुप्रकल्प भरत आले आहेत. यामुळे मराठवाड्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
‘जायकवाडी’सह मराठवाड्यात ११ मोठी धरणे आहेत. जायकवाडीच्या उर्ध्व भागात पाऊस पडत असल्याने सध्या ९४.५६ टक्के पाणीसाठा आहे. सिद्धेश्वर प्रकल्पात ९२ टक्के, येलदरी प्रकल्प ९९.५४ टक्के, निम्न दुधना ७३.१७ टक्के, मांजरा प्रकल्प ९४.२४ टक्के, निम्न तेरणा प्रकल्पात ९६ टक्के, इसापूर प्रकल्प १०० टक्के, माजलगाव- ५० टक्के, विष्णुपुरी ६३ टक्के, सीना कोळेगाव ८८ टक्के पाणीसाठा साचला आहे.
७५ मध्यम प्रकल्पांत ८० टक्के जलसाठा
धुवाधार पावसामुळे ७५ मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. चार दिवसांपूर्वी या सर्व प्रकल्पांत सरासरी ४८ टक्के जलसाठा होता. आज या प्रकल्पांत सरासरी ५१ टक्के पाणीसाठा आहे. यातील काही प्रकल्प शंभर टक्के भरल्याने सांडवे ओसंडून वाहू लागले आहेत.
लघुप्रकल्पांनाही लाभ
मराठवाड्यात ७५१ लघुप्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसांत मराठवाड्यातील ८७ मंडळांत अतिवृष्टी झाल्याने या मंडळांतील लघु प्रकल्प तुडुंब भरले आहेत. कमी पाऊस असलेल्या मंडळांतील प्रकल्पांत ५० टक्क्यांच्या आसपास साठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
९ उच्चपातळी बंधाऱ्यांत ९० टक्क्यांवर पाणी
मराठवाड्यात उच्चपातळीच्या १५ बंधाऱ्यांपैकी ९ बंधाऱ्यांत ९० टक्क्यांवर साठा आहे. उर्वरित बंधाऱ्यांत ६० ते ८० टक्के साठा आहे.