शेळीच्या पैशांवरून वाद अन् मध्यरात्री अख्खं गाव पेटलं; अंभईच्या दंगलीची 'इनसाईड' स्टोरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:10 IST2026-02-25T16:09:33+5:302026-02-25T16:10:12+5:30
अंभई दंगल प्रकरणी २०६ जणांवर गुन्हे दाखल; १३ जणांना अटक, गावात तणावपूर्ण शांतता

शेळीच्या पैशांवरून वाद अन् मध्यरात्री अख्खं गाव पेटलं; अंभईच्या दंगलीची 'इनसाईड' स्टोरी!
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड/अंभई: तालुक्यातील अंभई येथे शेळी आणि मटणाच्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादाचे पर्यवसन भीषण दंगलीत झाले आहे. या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन्ही गटातील एकूण २०६ लोकांविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल केले असून १३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण असून गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
नेमकी ठिणगी कशी पडली?
अंभई येथील शाहरुख पठाण याने कैलास मुंढे यांच्याकडून शेळी विकत घेतली होती. या व्यवहारातील पैशांवरून मंगळवारी दुपारी या दोघांत हाणामारी झाली होती. ग्रामस्थांच्या मध्यस्थीने दुपारी हा वाद मिटला, मात्र सायंकाळी नमाज झाल्यानंतर ७:३० च्या सुमारास परिस्थिती पुन्हा बिघडली. बसस्थानक आणि बाजारपेठ परिसरात दोन्ही गटांचा मोठा जमाव जमला आणि तुफान दगडफेक सुरू झाली.
मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि हिंसाचार
जमावाने दिसेल त्याला लक्ष्य करून लाठ्या-काठ्या आणि दगडांनी मारहाण केली. यात ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. संतापलेल्या जमावाने अनेक दुकाने फोडली आणि १५ ते २० वाहनांचे नुकसान केले. पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आले, मात्र त्यापूर्वीच काही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी पहाटेपर्यंत 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवून आरोपींच्या १० मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
राजकारणाची किनार आणि दहशत
अंभईतील या दंगलीला स्थानिक राजकारणाचीही किनार असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. यात भाजपचे माजी जिल्हा परिषद उमेदवार त्र्यंबक गव्हाणे यांचा मुलगा विक्रम गव्हाणे हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे गावात महिला आणि मुलांमध्ये प्रचंड दहशत असून बुधवारी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे टाळले. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
सरकार पक्षातर्फे पोहेका सांडु सखाराम जाधव यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार वरून अजिंठा पोलिसांनी आरोपी १) शाहरुख जफर पठाण, २) सलमान अहमद पठाण, ३) शाहरुख अहमद पठाण, ४) बाबा जफर पठाण, ५) रिझवान मुबारक शहा,६) सैयद अरबाज अय्युब, ७) आजिम जाफर पठाण, ८) इरशाद शकुर खान, ९) बबलु अली शहा, १०) शाहरुख बाबु शहा, ११) मोबीन कदीर पठाण, १२) एजाज अय्युब पठाण, १३) रमजान नसीरखा पठाण , १४) शेरु युनुस पठाण सर्व रा.अंभई
व दुसऱ्या गटातील १५) धनराज भगवान मुंढे ,१६) कैलास भगवान मुंढे,१७) कैलास रुपचंद मुंढे,१८) अजय मोहनसिंग मुंढे, १९) समाधान देवराव सपकाळ, २०) रामसेन चव्हाण , २१) विक्रम त्र्यंबक गव्हाणे , २२) राहुल भगवान ढगे, २३) सागर भगवान ढगे,२४) कैलास रतन शिमरे, २५) अभिजीत धनराज मुंढे, २६) गुरुप्रसाद कैलास बावस्कर सर्व रा अंभई यांच्यासह दोन्ही गटातील प्रत्येकी ९० अशा एकूण २०६ लोकांविरुद्ध पोलिसांनी दंगलीचे गुन्हे दाखल केले.