अजब! कन्नडमध्ये सुरू केलेले उपोषण, छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्र्यांच्या दारात मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:58 IST2025-10-20T12:43:13+5:302025-10-20T12:58:37+5:30
नवव्या दिवशी उपोषणकर्ते पोहोचले पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी

अजब! कन्नडमध्ये सुरू केलेले उपोषण, छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्र्यांच्या दारात मागे
कन्नड : तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत शासनाकडून ठोस मदत मिळावी, तसेच तत्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर १० ऑक्टोबरपासून एका व्यक्तीने सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर नवव्या दिवशी शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन मागे घेतल्याची अजब घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, कन्नड येथील संदीप विजयकुमार सेठी या व्यक्तीने, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकारप्रमाणे सरसकट नुकसानभरपाई द्यावी, पूरग्रस्त मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत करावी, सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी जाहीर करून नवीन कर्ज मंजूर करावे, बँक वसुली वर्षभरासाठी स्थगित करावी आदी मागण्यांसाठी १० ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांनी सेठी यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली; परंतु त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट जोपर्यंत उपोषणस्थळी येऊन आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासनाची गोची झाली. या कालवधीत सेठी यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार करण्यात आले.
शेवटी शनिवार आणि रविवार शासकीय सुट्टी आहे. त्यानंतरही दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी सुट्टीवर असतील, त्यामुळे उपोषण मागे घेण्यात यावे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्यांनतर तहसीलदार विद्याचरण कडवकर व शिवसेनेचे उपसंघटक शिवाजी थेटे यांनी पालकमंत्री शिरसाट यांच्या सहायकांशी संपर्क साधला. यावेळी पालकमंत्र्यांचे बिझी शेड्युल आहे. त्यामुळे त्यांना कन्नडला येणे शक्य नाही, असे सांगण्यात आले. उपोषणकर्त्यांनाच इकडे छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्र्यांच्या घरी आणा. इथेच उपोषण सोडवू, असा निरोप देण्यात आला. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरला जाण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर एका रुग्णवाहिकेमध्ये उपोषणकर्ते संदीप सेठी हे डॉक्टर आणि काही कार्यकर्त्यांसह छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले.
तहसीलदार, पोलिस अन् उपोषणकर्ते पोहोचले दारात
त्यांच्या रुग्णवाहिकेसोबत पोलिसांची एक जीप आणि तहसीलदार कडवकर यांची एक जीप असा तीन वाहनांचा ताफा शनिवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री शिरसाट यांच्या घरी पोहोचला. यावेळी शिरसाट यांनी उपोषणकर्ते सेठी यांना मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सेठी यांनी रात्री ९.३० वाजता शिरसाट यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. यावेळी त्यांच्या समवेत शिवाजी थेटे, सोनाली चुडीवाल, मेघा रावता, राहुल निकम, दीपक शेजवळ, किशोर वारेगावकर, भाऊसाहेब शिरसे आदींची उपस्थिती होती.