अमानुषतेचा कळस! पोलिसांनी संशयावरून तरुणाला भररस्त्यावर लाठी तुटेपर्यंत झोडपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:08 IST2026-01-24T12:08:26+5:302026-01-24T12:08:44+5:30

अंगावरील वळ पाहून काळजाचं पाणी होईल; मुकुंदवाडीतील 'त्या' दोन पोलिसांवर गुन्हा दाखल अन् निलंबन

The height of inhumanity! Chhatrapati Sambhajinagar Police beat a young man with a stick on the street on suspicion until he broke | अमानुषतेचा कळस! पोलिसांनी संशयावरून तरुणाला भररस्त्यावर लाठी तुटेपर्यंत झोडपलं

अमानुषतेचा कळस! पोलिसांनी संशयावरून तरुणाला भररस्त्यावर लाठी तुटेपर्यंत झोडपलं

छत्रपती संभाजीनगर : दुचाकी चोरीची असल्याचा आळ घेत दोन पोलिस अंमलदारांनी तरुणाला लाठी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तरुणाच्या संपूर्ण शरीरावर वळ उमेटपर्यंत मारहाण करण्यात आली. या घटनेची पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी गंभीर दखल घेतली. त्यानंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे अंमलदार गणेश वाघ व संतोष बिरारे या दोघांवरही जखमी तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

अक्षय ज्ञानेश्वर ठोकळ (३२, रा. मुकुंदवाडी) असे जखमीचे नाव आहे. २१ जानेवारी रोजी मध्यरात्री १२:३० वाजता अक्षय त्याचा मित्र भाऊसाहेब मोरे याच्यासह मुकुंदवाडीच्या बसथांबा परिसरात सिगारेट ओढण्यासाठी गेले होते तेव्हा तेथे अंमलदार वाघ व बिरारे उपस्थित होते. त्यांनी अक्षयला कशासाठी आलात, अशी विचारणा केली. भाऊसाहेबने त्यांना सिगारेटचे कारण सांगितले. मात्र, त्यांनी अचानक त्यांच्याकडील दुचाकीबाबत विचारणा केली. ती चोरीची असल्याचा संशय व्यक्त केला. अक्षयने ती दुचाकी बुलढाण्याचा मित्र शुभम जाधवची असल्याचे सांगितले शिवाय, त्याची कागदपत्रेही असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यातून त्यांच्यात वाद झाला. अक्षयच्या आरोपानुसार, त्याचे काहीही ऐकून न घेता बिरारे व वाघने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मांडी, पाठ, मानेवर लाठी तुटेपर्यंत वार केले.

जखमी अवस्थेतही केली मारहाण
पोलिसांच्या मारहाणीत अक्षय जखमी होऊन जमिनीवर कोसळला तरीही दोन्ही अंमलदार त्याला पोट, छातीत लाथांनी मारून शिवीगाळ करत होते. भाऊसाहेबने त्यांना थांबण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी त्यालाही मारहाण केली. त्यामुळे घाबरून भाऊसाहेबने घरी जाऊन अक्षयच्या भावाला घेऊन आला.

सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रकरण उघडकीस
मुकुंदवाडी पोलिसांकडून दोन दिवस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. शुक्रवारी मात्र या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. पोलिसांच्या या वागणुकीबाबत सर्व स्तरांतून टीका झाली. अक्षयच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अंमलदार संतोष बिरारे व गणेश वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस आयुक्तांची ठाण्यात धाव
घटनेची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त मनिष कल्याणकर यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात भेट दिली. त्यानंतर जखमी अक्षय व त्याच्या कुटुंबासोबत चर्चा करून कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

येथे दादागिरी, तिकडे गुन्हेगार सुसाट
मुकुंदवाडीत सातत्याने कुख्यात गुन्हेगारांचा हैदास सुरू आहे. एकीकडे राजनगर, मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसर, शिवाजीनगर ते रामनगर असा नव्याने झालेल्या रस्त्यावर गुन्हेगारांचा मोठा वावर असतो. नशा, लूटमार चालते. मात्र, रात्री मुकुंदवाडी ठाण्यातील एकही अधिकारी, कर्मचारी गस्त घालत नाही. अन्यत्र मात्र सामान्यांवर दंडेलशाही करत असल्याने स्थानिकांनी रोष व्यक्त केला.

Web Title : पुलिस की बर्बरता: चोरी के शक में युवक की बेरहमी से पिटाई।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में दो पुलिसकर्मियों ने बाइक चोरी के शक में एक युवक के साथ बेरहमी से मारपीट की, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गया। सार्वजनिक आक्रोश और सीसीटीवी फुटेज सामने आने के बाद, पुलिस आयुक्त के हस्तक्षेप के बाद अधिकारियों को निलंबित कर दिया गया और आरोप लगाए गए।

Web Title : Police brutality: Cops thrash youth mercilessly over suspicion of theft.

Web Summary : Two cops in Chhatrapati Sambhajinagar brutally assaulted a youth suspected of bike theft, leaving him severely injured. Following public outrage and CCTV footage surfacing, the officers were suspended and charged after police commissioner intervened.