भट्ट्या पेटल्या; गुढी पाढव्यासाठी साखरगाठी तयार, घरजावयांसाठी असते खास निर्मिती

By प्रशांत तेलवाडकर | Published: March 18, 2024 12:23 PM2024-03-18T12:23:33+5:302024-03-18T12:24:16+5:30

पारंपरिक कारखान्याच्या भट्ट्या पेटल्या असल्या तरी कारखान्यांची संख्या कमी झाल्याने उत्पादन ३० टन होण्याची शक्यता आहे.

The furnaces were lit; Sakhargathi is ready for gudhi padha, there is a special preparation for house husband | भट्ट्या पेटल्या; गुढी पाढव्यासाठी साखरगाठी तयार, घरजावयांसाठी असते खास निर्मिती

भट्ट्या पेटल्या; गुढी पाढव्यासाठी साखरगाठी तयार, घरजावयांसाठी असते खास निर्मिती

छत्रपती संभाजीनगर : नववर्षाला घरोघरी गुढी उभारली जाते, तिला साखरगाठी घातली जाते. तसेच लहान मुलांच्या गळ्यातही साखर गाठी घालून नववर्ष साजरे केले जाते. यासाठी यंदा व्यापाऱ्यांनी जवळपास ५० टन साखरगाठीची तरतूद केली आहे. पारंपरिक कारखान्याच्या भट्ट्या पेटल्या असल्या तरी कारखान्यांची संख्या कमी झाल्याने उत्पादन ३० टन होण्याची शक्यता आहे. शहराची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यावसायिकांनी जालना परभणी, नगर एवढेच नव्हे तर गुजरातेतून २० टन साखरगाठी मागविल्या आहेत.

शहरात किती पारंपरिक कारखाने
शहरात २० वर्षांपूर्वी साखरगाठी बनविणारे २५ पेक्षा अधिक कारखाने होते. आजघडीला गुलमंडी, कैलासनगर, रेंगटीपुरा, जिन्सी, सिडको, चिकलठाणा येथे एकूण ७ कारखाने सुरू आहेत. महाशिवरात्रीपासून दररोज दीड ते दोन टन साखरगाठी तयार होत आहेत.

साखरगाठीवर एकच डिझाईन ‘उगवता सूर्य’
साखरगाठीवर पूर्वी अनारकली, सरू, पेटी असे ५ ते ६ डिझाईन असत; पण आता लाकडी साचे बनविणारे कमी झाल्याने फक्त ‘उगवता सूर्य’ डिझाईन साखर गाठीवर दिसून येते.

साखरगाठी बनते कसे
पहिले साखरेचा मळ काढला जातो. त्यानंतर पाकात लिंबू व दूध मिसळले जाते. सागवणी साच्यात दोरी ठेवून त्यात साखर पाक भरला जातो. पाक गार व घट्ट झाल्यावर साच्यातून साखरगाठी बाहेर काढल्या जाते. मात्र, हे काम वाटतेय एवढे सोपे नाही, किचकट व चिकट काम असते.

साखरगाठीत ४० रुपयांनी भाववाढ
साखरगाठीसाठी सागवाणी साचे वापरले जातात. एक किलोचा साच्या १५०० वरून ३ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. ७० रुपये किलोचा लिंबू २०० रुपयात मिळतो आहे. तर १९० रुपये किलोची दोरा २४० रुपये किलोने मिळत आहे. परिणामी, साखरगाठीचे भाव ४० रुपयांनी वधारुन सध्या १४० ते १६० रुपये किलो झाले आहेत.
- जगन्नाथ बसैये, साखर गाठी उत्पादक

गुजरातची साखरगाठी ‘कडक’
मराठवाड्यात साखरगाठी तयार करण्यासाठी सागवाणी साचे वापरले जातात. नरम असल्याने या साखरगाठी लहानमुलेही सहज खाऊ शकतात. मात्र, गुजरातमध्ये लोखंडी मशीनमध्ये साखरगाठी तयार होतात. त्या कडक होऊन जातात. लहान मुलांना दाताने तोडणे कठीण जाते.

जावई नाराज
पूर्वी लाडक्या जावयासाठी नोटा लावलेल्या साखरगाठी येत असे. मात्र, सरकारने त्यावर बंदी आणली आहे. यामुळे नोटा लावलेल्या साखरगाठी मिळत नसल्याने जावई वर्ग नाराज आहे; पण घरजावईसाठी आरसा लावलेल्या साखरगाठी बाजारात आल्या आहेत.

Web Title: The furnaces were lit; Sakhargathi is ready for gudhi padha, there is a special preparation for house husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.