छत्रपती संभाजीनगर : पहिल्या दारुड्या पतीपासून फारकत घेतल्यानंतर एकाने तिच्याशी दुसरे लग्न केले. मात्र, तोदेखील दारुडा निघाला. सासरच्यांनी तिचा अतोनात छळ केल्याने विवाहितेने गळफास घेतल्याचा प्रकार शनिवारी (दि. २६) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास देवळाई भागात घडला. ज्योती शैलेश पाध्ये (रा. हिमालया रेसिडेन्सी, खडी रोड, देवळाई) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
ज्योतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती शैलेश शरदराव पाध्ये, सासू मंगल, दीर योगेश, जाऊ गायत्री, चुलत सासरा मुकुंद आणि त्याची पत्नी (रा. कळमनुरी, जि, हिंगोली) यांच्याविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली.
फिर्यादी चंद्रकला सुरेश सोनवणे (रा. पिसादेवी रोड) यांची मुलगी ज्योती हिचे २०११ साली चिकलठाण्यातील एका तरुणाशी लग्न झाले होते. मात्र, तो दारुडा निघाल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून तिने फारकत घेतली. त्यानंतर शैलेश पाध्ये याने ज्योतीला लग्नासाठी मागणी घातली. तिच्या पहिल्या लग्नाविषयी आणि फारकत झाल्याचे पाध्ये कुटुंबाला सांगितले होते. तरीही लग्नास तयार झाल्याने १३ मार्च २०२३ रोजी शैलेश सोबत ज्योतीचा आंतरजातीय विवाह करून दिला. लग्नानंतर दोन महिने चांगले नांदविले. त्यानंतर तिला सासरचे मानसिक त्रास देऊ लागले.
पती शैलेश दारू पिऊन तिला मारहाण करू लागला. दिवाळीला माहेरी गेल्यानंतर ज्योतीने तिच्या घरच्यांना सर्व प्रकार सांगितला होता. घरातील सर्व कामे ती एकटीच करायची. जाऊ गायत्रीला चहापासून जेवणापर्यंत सर्व बेडवर नेऊन द्यायला लावायचे. दीर योगेश तिला वाईट बोलत असे. तिची उपासमार करू लागले. ज्योती आणि शैलेश वेगळे राहिले तरीही शैलेशने तिला कधी भाजीपालादेखील आणून दिला नाही. चुलत सासरा मुकुंद आणि त्याची पत्नी लुडबुड करून सासरच्यांना भडकावून द्यायचे. त्रासाला कंटाळून गळफास घेऊन अखेर आत्महत्या केली असे तक्रारीत नमूद आहे.