भरधाव टेम्पोने दुचाकीवरील दोघांना चिरडले; अपघातानंतर चालक पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 19:03 IST2023-03-23T19:01:51+5:302023-03-23T19:03:39+5:30
या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव टेम्पोने दुचाकीवरील दोघांना चिरडले; अपघातानंतर चालक पसार
सिल्लोड: भराडी बसस्थानकजवळ बुधवारी रात्री १०.३० वाजता भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीवरील दोघांना चिरडले. संजय रामराव सहाणे (४०, रा.शिरसगाव मंडप ता.भोकरदन) आणि नरसिंग दादाराव चिकटे (५०, रा.तांदुळवाडी ता भोकरदन) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय सहाणे आणि नरसिंग चिकटे दुचाकीवरून ( एमएच २१ बीटी ७९९६ ) सिल्लोडहून बोरगावकडे जात होते. याचदरम्यान अद्रक घेऊन जाणारा एक टेम्पो ( एमएच ०६ एजी ७१८८ ) भराडीकडून सिल्लोडकडे येत होता. या भरधाव टेम्पोने भराडी-सिल्लोड रस्त्यावरील भराडी बसस्थानकजवळ दुचाकीस जोराची धडक दिली. यात संजय सहाणे आणि नरसिंग चिकटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक तेथून पसार झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, पसार टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वाय. एस. कुलकर्णी करत आहेत.