फुकटच्या जेवणासाठी हॉटेल चालकाच्या हत्येचा प्रयत्न; तडीपार गुंडाचा छ. संभाजीनगरात हैदोस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:55 IST2025-12-04T13:54:24+5:302025-12-04T13:55:02+5:30
क्रांतीचौक पोलिसांकडून शोध घेत अटक, तीन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी

फुकटच्या जेवणासाठी हॉटेल चालकाच्या हत्येचा प्रयत्न; तडीपार गुंडाचा छ. संभाजीनगरात हैदोस
छत्रपती संभाजीनगर : गंभीर गुन्हे केल्याने तडीपार असलेला शिवा चावरिया जुन्या मोंढ्यातील हॉटेल मालकाला धमकावत होता. ‘मुझे फुकट में खाना दे दो, नही तो आपको जान से मार दूंगा’, असे म्हणत हॉटेल चालकाच्या हत्येचा प्रयत्न शिवा राजकिरण चावरियाने (रा. गांधीनगर) केला. तीन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याच्यावर आतापर्यंत आठपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
शेख नाजीम शेख शेरू (४०, रा. न्यू बायजीपुरा) हे चुलत भाऊ शेख नफीससोबत न्यू जनता नावाने जुना मोंढा येथे हॉटेल चालवतात. रेकॉर्डवरील गुन्हेगार शिवा हा रात्री हॉटेलमध्ये येऊन दमदाटी, शिवीगाळ करून फुकट जेवण घेऊन जात होता. २९ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० वाजता शेख हॉटेल बंद करून घरी निघत असताना चावरियाने धमकी देत जेवण मागितले. शेख यांनी त्याची समजूत घालून परत पाठवून दिले. थोड्या वेळाने शिवाने पुन्हा हातात रॉड घेऊन हॉटेलमध्ये जात त्यांच्या डोक्यात वार केले. यात शेख रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध झाले. रॉडचा दुसरा वार हातावर झाल्याने त्यांचा हातही गंभीररीत्या फ्रॅक्चर आहे.
चावरिया मोंढ्यातील अनेक विक्रेते, व्यापाऱ्यांसह हॉटेल चालकांवर दादागिरी करत होता. रविवारच्या बाजारातही अनेकांकडून पैसे उकळतो. मात्र, भीतिपोटी कोणी तक्रार करत नव्हते. त्याला तडीपार करण्यात आले होते. तरीही तो परिसरात वावरत होता. क्रांतीचौक पोलिस उपनिरीक्षक अशोक इंगोले, अंमलदार संतोष मुदिराज, माजीद पटेल यांनी त्याचा शोध घेत अटक केली.