मानधन मिळाल्याने स्वयंपाकी खूश, धान्यादी मालांसाठी पदरमोडीने मुख्याध्यापकांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 20:03 IST2022-10-18T20:02:42+5:302022-10-18T20:03:08+5:30
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमध्ये नेमलेल्या स्वयंपाकी, मदतनिसांचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांचे मानधन रखडले होते.

मानधन मिळाल्याने स्वयंपाकी खूश, धान्यादी मालांसाठी पदरमोडीने मुख्याध्यापकांची नाराजी
औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या स्वयंपाकी, मदतनिसांचे तीन महिन्यांचे रखडलेले मानधन सोमवारी वितरित केल्यामुळे त्यांचे चेहरे खुलले आहेत, तर दुसरीकडे खाद्यतेल, इंधन, भाजीपाल्यासाठी पदरमोड करणाऱ्या मुख्याध्यापकांना मागील सहा महिन्यांपासून अजून एक खडकूही मिळाला नसल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर उमटला आहे.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमध्ये नेमलेल्या स्वयंपाकी, मदतनिसांचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांचे मानधन रखडले होते. अखेर सोमवारी पोषण अधीक्षक कार्यालयाने जिल्ह्यातील २१२८ शाळांमधील ५ हजार ९०० स्वयंपाकी व मदतनीसांना प्रत्येकी ४५०० रुपये या प्रमाणे तीन महिन्यांचे मानधन संबंधितांच्या बँक खात्यात जमा केले. मात्र, मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेले खाद्यतेल, इंधन, भाजीपाल्याची मोठी देयके वितरित झाली नसल्यामुळे बचतगट व मुख्याध्यापकांत नाराजी पसरली आहे.
गॅस, खाद्यतेल व भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून बचत गट आणि मुख्याध्यापक हे पदरमोड करत प्रसंगी दुकानदारांकडून उधारीने इंधन व भाजीपाला आणून खिचडी शिजवून गरीब मुलांना खाऊ घालतात. आता सहा महिने होत आले. आणखी तेल, इंधन, भाजीपाल्याच्या निधीची कुठपर्यंत वाट बघायची. ज्या दिवशी हा खर्च असह्य होईल. त्या दिवशी योजनेचा पुनर्विचार करावा लागेल, असा पवित्रा शिक्षक भारतीचे प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, महेंद्र बारवाल, किशोर कदम, संतोष ताठे, राजेश भुसारी, मच्छिंद्र भराडे, रमेश जाधव या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
सुटीच्या दिवशीही दाखविली तत्परता
स्वयंपाकी व मदतनिसांचे रखडलेले मानधन अदा करण्यासाठी शालेय पोषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार या सुटीच्या दोन दिवशी कार्यालयात थांबून मानधन वाटपासाठी परिश्रम घेतले. रखडलेले ३ महिन्यांचे मानधन देऊन स्वयंपाकी व मदतनिसांच्या कुटुंबांची दिवाळी गोड करावी, यासाठी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय नेते तसेच स्थानिक पदाधिकारी मधुकर वालतुरे, जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे, कैलास गायकवाड, बळीराम भुमरे, बाबासाहेब जाधव, गिनंदेव आंधळे, हारूण शेख, प्रशांत हिवर्डे, विष्णू बोरूडे, संजय भुमे, जालिंदर चव्हाण आदींनी सतत पाठपुरावा केला होता. अखेर एकदाचे मानधन वितरित झाले.