दुचाकीला उडवल्यानंतर कंटेनर उलटले; कापसाच्या गाठी खाली दबून दुचाकीवरील एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 19:55 IST2024-10-18T19:54:55+5:302024-10-18T19:55:42+5:30
रस्ता ओलांडताना घडला अपघात; दुचाकी चालक दूर फेकला गेल्याने बचावला

दुचाकीला उडवल्यानंतर कंटेनर उलटले; कापसाच्या गाठी खाली दबून दुचाकीवरील एकाचा मृत्यू
वाळूज महानगर : रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्यानंतर भरधाव कंटेनर उलटून त्यातील कापसाच्या गाठीखाली दबून दुचाकीच्या पाठीमागे बसलेला ४६ वर्षीय व्यक्ती ठार झाला. सुदैवाने दुचाकी चालक तरुण दूर फेकल्याने बालंबाल बचावला. हा अपघात गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास साजापूर चौफुलीवर झाला. या अपघातात लक्ष्मण महादू गवळी (४६, रा.आसेगाव) हे ठार झाले असून स्वप्नील अनिल जाधव (२५, रा. करोडी) हा तरुण किरकोळ जखमी झाला.
पोलिसांनी सांगितले की, लक्ष्मण महादू गवळी (४६, रा. आसेगाव) यांच्या शेतात देवीचे मंदिर असून ते होम-हवनासाठी लागणारे पुजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी साडूचा मुलगा स्वप्नील अनिल जाधव यास सोबत घेऊन दुचाकीने ( एम.एच.२०, ई.टी.७९०८) साजापूरला गेले होते. साजापूर परिसरातून पुजेचे साहित्य खरेदी केल्यानंतर ते आसेगावला घरी निघाले होते. साजापूर चौफुलीवरून रस्ता ओलांडत असताना लासूरकडून ए. एस. क्लबच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने ( एन.एल.०१, ए.जे.०६२६) त्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेने दुचाकीस्वार स्वप्नील रस्त्यावर पडला तर कंटेनर पलटी होऊन त्यातील कापसाच्या गाठीखाली लक्ष्मण गवळी हे दबून गंभीर जखमी झाले. वाहनस्वार व चौफुलीवर नागरिकांनी मदत करीत कापसाच्या गाठीखाली दबलेल्या गवळी यांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत लक्ष्मण गवळी यांना दोन विवाहित मुली व पत्नी असून त्यांच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
कंटेनर चालक ताब्यात
पोलिसांनी कंटेनर चालक मुन्नीलाल केवाट (२६, रा. बिहार) यास ताब्यात घेतले. चालक मुन्नीलाल केवाट हे गुजरातमधील सुरत येथून कंटेनरमध्ये कापसाच्या गाठी भरून तामिळनाडूकडे जात होते. या अपघाताची एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली. पो.हे.कॉ. अरुण उगले हे अधिक तपास करीत आहेत.