छत्रपती संभाजीनगर : सोमवारी पोलिस आयुक्तालयात स्वत: पायी चालत आलेल्या खा. संदीपान भुमरे व आ. विलास भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याची मंगळवारी अचानक प्रकृती बिघडली. मंगळवारी जावेद खासगी रुग्णालात दाखल झाला. त्यानंतर डॉक्टरांचे दोन पानी पत्र वकिलामार्फत आर्थिक गुन्हे शाखेत पोहोचते करत पाच दिवसांचा वेळ मागितला. जावेदच्या या लेटर कॉन्स्पीरसीमुळे पोलिस अधिकाऱ्यांनादेखील आश्चर्य वाटले.
ॲड. मुजाहिद इकबाल खान समीरउल्ला खान (रा. परभणी) यांच्या तक्रारीवरून जावेदची, काल्डा कॉर्नर येथील कोट्यवधी रुपयांची जमिनीच्या बनावट कागदपत्रांद्वारे बक्षिसी मिळाल्याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. मुजाहिद यांच्या दाव्यानुसार जमिनीचे मूळ दावेदार मीर महेमूद अली खान यांनी त्यांना ९० लाख ते एक कोटी रुपयांच्या व्यवहारात काल्डा कॉर्नर येथील तीन एकर जमिनीचे ॲग्रिमेंट टू सेल, नोंदणीकृत मुखत्यारनामा व ‘हिब्बानामा’ करून दिला आहे. मात्र, त्यानंतरही महेमूद अली यांनी भुमरेंकडून मोठी रक्कम घेत जावेदच्या नावे त्याच जमिनीचा बनावट ‘हिब्बानामा’ करून दिला.
नाते सिद्ध करण्यास आणखी ५ दिवस?१५० कोटी रुपयांपर्यंत भाव असलेल्या जमिनीच्या घोटाळ्यावरून राज्यभरात चर्चा सुरू आहे. त्यातच सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जावेदकडे याबाबत कसून चौकशी केली. त्यात त्याला सांगूनही जमिनीसंदर्भात त्याने कुठलीही कागदपत्रे सादर केली नाहीत. जावेदने सुरुवातीला सालारजंग वंशजांसोबत नाते असल्याने जमीन बक्षिसी स्वरूपात मिळाल्याचा दावा केला. त्यामुळे त्याला पुन्हा मंगळवारी हजर राहून नातेसंबंध सिद्ध करण्यास सांगितले होते. मात्र, मंगळवारी सकाळी त्याच्या वकिलांनी जावेदची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांचे पत्र सादर केले. त्यात डॉक्टरांनी त्याला रक्तदाबासह अन्य त्रास होत असल्याचे नमूद करत पाच दिवसांचा आराम करण्याचा सल्ला दिल्याचे लिहिले आहे.