आरक्षणाची लढाई जिंकली; आता तिकिटाची सुरू! खुल्या प्रवर्गात अनेक इच्छुकांच्या अक्षरश: उड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:46 IST2025-11-12T19:45:29+5:302025-11-12T19:46:30+5:30
महापालिकेची निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये वाढली आहे.

आरक्षणाची लढाई जिंकली; आता तिकिटाची सुरू! खुल्या प्रवर्गात अनेक इच्छुकांच्या अक्षरश: उड्या
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या आरक्षण सोडतीसाठी अनेक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते. बहुतांश उमेदवारांना आपल्या सोयीचा प्रभाग मिळला. आरक्षणाची लढाई तर अनेकांनी जिंकली. आता खरी लढाई तिकिटासाठी सुरू होणार आहे. ज्या राजकीय पक्षाचे तिकीट त्याला निवडणूक येण्याची गॅरंटी आहे. कारण, प्रभाग पद्धतीत अपक्षांचा निभाव लागणे थोडे अवघडच आहे. एकाच प्रवर्गात उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त झाल्याने राजकीय पक्षांची तिकीट कोणाला द्यावे, म्हणून कोंडी होणार हे निश्चित.
महापालिकेची निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये वाढली आहे. मागील पाच वर्षांत इच्छुकांनी अनेकदा निवडणुकीसाठी तयारी केली. मात्र, निवडणुका होतच नसल्याने अनेकांनी तयारीही सोडून दिली होती. आता प्रभाग आरक्षण, आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडल्याने निवडणुका होतीलच, असे गृहीत धरले जात आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयानेही जानेवारी अखेरची डेडलाइन दिली आहे. मंगळवारी महापालिका निवडणुकीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडतीत अनेक दिग्गजांना धक्का बसला. काहींना मनासारखा प्रभाग मिळाल्याने उत्साह अधिक वाढला आहे.
प्रभाग क्रमांक १ ते २८ पर्यंत ‘ड’ प्रवर्ग खुला करण्यात आला. त्यामुळे आरक्षणात न बसणाऱ्या सर्वांची नजर याच प्रवर्गाकडे आहे. ‘क’ प्रवर्गात २५ महिला सर्वसाधारण प्रवर्गातील लढतील. प्रभाग क्रमांक १० आणि १२ मध्ये दोन खुले प्रवर्ग आहेत.
आरक्षण सोडत पार पडताच इच्छुकांना आता तिकिटाचे वेध लागले आहेत. सर्वाधिक भाऊगर्दी तिकिटासाठी सध्या भाजपा, एमआयएम, शिंदेसेनेकडे आहे. एकाच प्रवर्गात एकाच सर्वसाधारण प्रवर्गात तिकीट मागणाऱ्यांची संख्या दहापेक्षा अधिक आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी अधिक वाढणार आहे. त्यात बंडखोरीची भीतीही राहील. सर्वसाधारण प्रवर्गात बंडखोर निवडून येणाऱ्यांना पाडण्याची ताकदही ठेवू शकतात.