मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाची लढाई जोमाने लढावी लागेल: संजय शिरसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:18 IST2025-02-03T19:16:55+5:302025-02-03T19:18:18+5:30

मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, मसिआ आणि टीम ऑफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी चिकलठाणा एमआयडीसीतील मसिआच्या सभागृहात रविवारी दुसरी जलसंवाद परिषद पार पडली.

The battle for Marathwada's water issue will have to be fought vigorously; Sanjay Shirsat at the Jal Samvad Conference | मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाची लढाई जोमाने लढावी लागेल: संजय शिरसाट

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाची लढाई जोमाने लढावी लागेल: संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याने पाणी मागताच, अहिल्यानगर आणि नाशिकचे पुढारी हे पाणी जणू पाकिस्तानला चालले आहे, अशा पद्धतीची भूमिका घेतात. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागतोय. पक्षीय लेबल बाजूला ठेवून मराठवाड्याचे सर्व आमदार, खासदार एकत्र आले तरच पाणीप्रश्न सुटेल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी येथे जलसंवाद परिषदेत केले.

मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, मसिआ आणि टीम ऑफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी चिकलठाणा एमआयडीसीतील मसिआच्या सभागृहात रविवारी दुसरी जलसंवाद परिषद पार पडली. पालकमंत्री संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, धाराशिवचे आ. कैलास पाटील, आ. अनुराधा चव्हाण, माजी आ. राजेश टोपे, सा. बां. विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, जलतज्ज्ञ डॉ. या. रा. जाधव, संजय लाखे पाटील, आयोजक डॉ. शंकर नागरे, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, रमाकांत पुलकुंडवार, अभियंता जयसिंह हिरे, सर्जेराव वाघ आणि महेंद्र वडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रोपट्यांना पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. संजय शिरसाट म्हणाले की, पाणीप्रश्नासंदर्भात अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतील जनतेचा उठाव नाही, परंतु तेथील पुढारी जाणूनबुजून माथी भडकवण्यासाठी मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध करतात आणि त्यांचा प्रदेश सुजलाम्, सुफलाम् करण्यासाठी प्रयत्न करतोय, हे दाखवतात. या परिषदेकडे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याबाबत ते म्हणाले की, जनता पाण्याच्या प्रश्नांवर कान टोचत नसल्याने त्यांना गांभीर्य नाही. रमाकांत पुलकुंडवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नागरे, हिरे आणि वडगावकर यांनी मराठवाड्याच्या जलस्थितीचे सादरीकरण केले.

दबाव गट करावा
आजपर्यंत आयोजित सर्व पाणी परिषदेला आलो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जीआरमध्ये समन्यायी पाणीवाटपाबाबत उल्लेख आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने असलेल्या गोष्टी त्यात आहेत. त्यांची अंमलबजावणी व्हावी. मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी दबावगट निर्माण करावा.
- राजेश टोपे, माजी मंत्री

मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे
मराठवाड्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यांना याबाबत कळत नाही की जाणून घ्यायची इच्छा नाही? एकूणच जनरेटा त्यांच्यामागे नाही. म्हणूनच ते याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते. समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पाणी मिळावे.
- आ. कैलास पाटील

आमच्या धरणातून शहापूरला पाणी नको
दुष्काळग्रस्त वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यांसाठी नाशिक जिल्ह्यात बांधलेल्या भाम, वाकी, भावली आणि मुकणे इ. धरणांतील पाणी २५ टक्के पाणीही आम्हाला मिळत नाही. कायद्यानुसार हे पाणी देता येत नाही. असे असताना मुबलक पाणी असलेल्या शहापूरला आमच्या प्रकल्पावर पाणीपुरवठा याेजना आणली, हे कायद्याच्या विरोधात आहे.
- आ. रमेश बोरनारे

मराठवाड्यातील आमदारांनी एकत्र येणे गरजेचे
मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदारांनी एकत्र येऊन पाणीप्रश्न सोडविणे शक्य आहे, कारण आपली बाजू सत्याची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याला देण्यास तयार आहेत, परंतु मराठवाड्यातील आमदारांची साथ नसल्याने तेही काही करू शकत नसल्याचे दिसते. यातून मराठवाड्याचे नुकसान होतेय.
- आ. प्रशांत बंब

Web Title: The battle for Marathwada's water issue will have to be fought vigorously; Sanjay Shirsat at the Jal Samvad Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.