वाळू माफियांना प्रशासन धूळ चारणार; आता थेट वाहनांचा परवाना रद्द करणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:00 IST2025-12-11T16:59:21+5:302025-12-11T17:00:02+5:30
शासनाच्या या निर्णयामुळे अवैध वाळू तस्करीला चाप बसेल, असा दावा करण्यात येत आहे.

वाळू माफियांना प्रशासन धूळ चारणार; आता थेट वाहनांचा परवाना रद्द करणार!
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाळू आणि इतर गौण खनिजांच्या चोरीमुळे शासनाच्या महसुलाची आणि पर्यावरणाची मोठी हानी होत आहेच, सोबतच या अवैध व्यवसायातून गुन्हेगारी वाढत आहे. यामुळे गौण खनिजांची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचा परवाना (परमिट) थेट निलंबित किंवा रद्द केला जाणार आहे. महसूल विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.शासनाच्या या निर्णयामुळे अवैध वाळू तस्करीला चाप बसेल, असा दावा करण्यात येत आहे.
वाहनांचा परवाना निलंबित व रद्द होणार...
अवैध वाळूची वाहतूक करताना एखादे वाहन सापडल्यास त्याचा परवाना जागेवरच रद्द केला जाईल किंवा थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. आरटीओच्या निर्देशानुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन टप्पे ठरविले आहेत.
तीन टप्प्यांत होणार कारवाई...
• पहिला गुन्हा : ३० दिवसांसाठी परवाना (परमिट) निलंबित करणे आणि वाहन ताब्यात घेणे.
• दुसरा गुन्हा : ६० दिवसांसाठी परवाना निलंबित करणे आणि वाहन ताब्यात घेणे.
• तिसरा गुन्हा : संबंधित वाहनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करणे. आरटीओमार्फत वाहन जप्त करणे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालतात वाहने...
तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, गौण खनिज विभागाच्या पथकावर वाळू माफिया हल्ले करतात. त्यांच्या अंगावर हायवा सारखी वाहने घालण्याचा प्रयत्न करण्याच्या घटना अधून-मधून घडतात.
आठ महिन्यांत २ कोटींचा दंड
आठ महिन्यांत १०० कारवाया करण्यात आल्या. यात २ कोटी २२ लाख रुपयांचा दंड लावण्यात आला, तसेच १ कोटी ३२ लाखांची दंड वसुली करण्यात आली.
१५ जणांवर गुन्हे, ४ जण अटकेत...
१ एप्रिलपासून आजवर १५ गुन्हे दाखल झाले. त्यात ४ आरोप अटक आरोपींना अटक करून १०५ वाहने जप्त करण्यात आले.
परिपत्रकानुसार कारवाई होईल...
शासनाच्या परिपत्रकानुसार गौण खनिज चोरी करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात येईल.
- दिनेश झांपले, जिल्हा गौण खनिज अधिकारी