वेरूळ लेणीजवळ भीषण अपघात; दोन ट्रकच्या धडकेनंतर बॉयलरखाली दबून सासू-जावयाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 19:57 IST2025-09-11T19:56:38+5:302025-09-11T19:57:48+5:30
जड वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली, दोन निष्पाप जीवांचा बळी

वेरूळ लेणीजवळ भीषण अपघात; दोन ट्रकच्या धडकेनंतर बॉयलरखाली दबून सासू-जावयाचा मृत्यू
खुलताबाद: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीजवळ घाटात आयशर ट्रक व 16 टायर ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात आयशर ट्रकवरील बॉयलर बेल्ट तुटून रस्त्यावर कोसळला. याचवेळी तेथून जाणारे दुचाकीस्वार बॉयलरखाली आली. यात दुचाकीवरील सासू आणि जावई यांचा करुण अंत झाल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वेरूळ येथील रहिवासी कचरू सांडू त्रिभुवन (वय 42) हे सासू चंद्रभागाबाई आसाराम भालेराव ( वय 65) यांच्यासह दुचाकीवरून (MH 20 GP 1404) राजीवगांधी नगर येथून खुलताबाद येथे जात होते. तेवढ्यात कन्नडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा आयशर ट्रक(MH 42 AQ 9646) व खुलताबादहून कन्नडकडे जाणारा 16 टायर ट्रक क्र.(MH 40 CQ 7355) यात समोरासमोर धडक झाली. भीषण धडकेत आयशर ट्रकवरील औद्योगिक वापरासाठीचा बॉयलर बेल्ट तुटून रस्त्यावर कोसळला. यावेळी दुचाकीवरील कचरू सांडू त्रिभुवन व त्यांच्या सासुबाई चंद्रभागाबाई भालेराव बॉयलर खाली येऊन गंभीर जखमी झाले. सामाजिक कार्यकर्ते शेख मस्सीउद्दीन,पोहेकॉ प्रमोद साळवी व इतरांनी जखमींना खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठीची तयारी सुरू आहे. दरम्यान, बॉयलर कोसळल्याने एका चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अपघाताने घटमधील वाहतूक ठप्प झाली होती.
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
विशेष म्हणजे वेरूळ येथील लेणी क्रमांक 16 समोर बुधवारी मध्य रात्रीच चोरट्यांनी एटीएमसह त्यातील रक्कम चोरून नेली आहे. या कामी तेथे अनेक पोलीस कर्मचारी हे तपासणीसाठी जपते. त्यांच्या समोरून आयशर ट्रक बॉयलर घेऊन पुढे गेला. तरी देखील त्यांनी रोखले नाही. शिवाय खुलताबाद येथे देखील उरूस सुरू आहे. त्या परिसरात अपघात झाला असता तर मोठी जीवितहानी घडली असती.
जड वाहतुकीसाठी घाटरस्ता बंद
वेरूळ येथील भोसले चौक ते दौलताबाद टी पॉइंट पर्यंत रस्ता हा जड वाहतुकीसाठी बंद आहे. त्यात खुलताबाद येथे उरूस सुरू आहे. अनेक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. मात्र असे असून देखील ट्रक या रस्त्यावर कसा आला? याबाबत दोषींवर कारवाई करावी.
- सतीश देवेंद्र लोखंडे, वेरूळ, सामाजिक कार्यकर्ते