छ. संभाजीनगरात रात्रीतून २ ठिकाणी तणावाच्या घटना, पाेलिसांच्या सतर्कतेमुळे स्थिती नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 12:11 IST2025-08-01T12:09:32+5:302025-08-01T12:11:25+5:30

पानदरिबा तणाव प्रकरण, लच्छू पहलवानसह ४० जणांवर गुन्हा दाखल; कुत्र्यावरून वाद, शताब्दीनगरात तरुणावर चाकू-तलवारीने हल्ला

Tensions flared at 2 places in the City Chowk area overnight at Chhatrapati Sambhajinagar, situation under control due to police vigilance | छ. संभाजीनगरात रात्रीतून २ ठिकाणी तणावाच्या घटना, पाेलिसांच्या सतर्कतेमुळे स्थिती नियंत्रणात

छ. संभाजीनगरात रात्रीतून २ ठिकाणी तणावाच्या घटना, पाेलिसांच्या सतर्कतेमुळे स्थिती नियंत्रणात

छत्रपती संभाजीनगर : लोटाकारंजा येथे महिलेच्या छेडछाड प्रकरणात मारहाण झालेल्या मुलाला घेऊन रात्री ११:४५ वाजता पानदरिबा परिसरात सोडण्यासाठी गेलेल्या तरुणांवर ३० ते ४० जणांच्या टोळक्याने हल्ला चढवला. तलवारीने वार केले. सिटी चौक परिसरात या घटनेमुळे तणाव निर्माण झालेला होता. शताब्दीनगरमध्ये कुत्र्यावरच्या वादातून तरुणाचा पाठलाग करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र, सिटी चौक पोलिसांच्या सतर्कता व कठोर भूमिकेमुळे अनुचित प्रकार टळला.

बुधवारी रात्री चंपा चौकात महिलेच्या छेडछाडीच्या संशयावरून एका तरुणाला मारहाण झाली. त्याला घेत मोहम्मद कैफ (२१) मित्र दानिश सोबत अंगुरीबाग परिसरात त्याचे घर शोधत गेले. मात्र, पानदरिबातील दूध डेअरीसमोर त्यांचे स्थानिकांसोबत वाद झाले. उमेश नामक तरुणाने कैफ, दानिशला मारहाण सुरू केली. लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहलवान व उमेशसह ३० ते ४० जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. बाखरियाने दोघांना घरात नेताच काही तरुण त्यांच्या मागे लोखंडी तलवारीसह धावले. स्थानिकांनी बाखरियाच्या घरात जात दोघांना मारहाण सुरूच ठेवली. दानिशने त्याच्या मित्रांना हा प्रकार सांगितल्यानंतर सिटी चौक परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिस ठाण्यासमोर शेकडोंचा जमाव जमला. सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन पाटील, संपत शिंदे, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, दिलीप चंदन यांनी घटनास्थळी धाव घेतली. दंगा काबू पथक तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

गंभीर कलमान्वये गुन्हा, अटकेचे आदेश
पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा सिटी चौक परिसरात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी बाखरियासह टोळक्यांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून वरिष्ठांनी सर्वांच्या अटकेचे आदेश दिले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी २ संशयितांना ताब्यात घेतले होते.

कुत्र्यावरून वाद, चाकूने वार
एकीकडे पानदरिबात तणाव सुरू असताना सिटी चौक ठाण्याच्या हद्दीतच शताब्दीनगरमध्ये भर चौकात २ गटात तुंबळ हाणामारी झाली. हातात चाकू, तलवारीसह तरुण धावत सुटल्याने स्थानिक घाबरून गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, रोहित तुपे (३६) हे बुधवारी रात्री १० वाजता घरी परतले. तेव्हा रस्त्यात संजय शिरसाट यांचे पाळीव कुत्रे मोठ्याने भुंकत असल्याने तुपे यांनी कुत्र्याला नीट सांभाळण्यास सांगितले. त्यातून त्यांच्यात वाद पेटत तुपेंना मारहाण करण्यात आली. काही वेळाने तुपे भावासह पुन्हा शिरसाटकडे गेले. तोपर्यंत त्यांच्या मागे त्याचे दोन्ही मुले आनंद व चेतन हातात तलवार घेऊन धावत सुटले. आनंदने त्यांच्या डोक्यात तलवारीने वार केल्याने तुपे रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले. दुसऱ्याने पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भावाला देखील हल्लेखोरांनी जखमी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिस निरीक्षक दिलीप चंदन यांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Tensions flared at 2 places in the City Chowk area overnight at Chhatrapati Sambhajinagar, situation under control due to police vigilance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.