छत्रपती संभाजीनगर ते पुणे ग्रीन फिल्ड मार्गासाठी नव्या वर्षात निविदा; विद्यमान रस्त्याचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:55 IST2025-11-05T14:50:28+5:302025-11-05T14:55:02+5:30
औद्योगिक विकासासह इतर दळणवळणास मिळेल चालना

छत्रपती संभाजीनगर ते पुणे ग्रीन फिल्ड मार्गासाठी नव्या वर्षात निविदा; विद्यमान रस्त्याचे काय?
छत्रपती संभाजीनगर : पुणे ते छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्ग प्रकल्पाबाबत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) सविस्तर आराखडा निश्चित झाल्यानंतर आता निविदेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
नव्या वर्षात शिरूर ते संभाजीनगरपर्यंतच्या मार्गासाठी निविदा निघणे शक्य आहे. हा द्रुतगती मार्ग तीन टप्प्यांत उभारण्यात येणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील काम प्रगतिपथावर असून, पुणे ते शिरूर उड्डाणपूल मार्गासाठी आर्थिक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या टप्प्यात वेलस्पन एंटरप्रायजेस या संस्थेची सर्वात निविदा पात्र ठरण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगरदरम्यानचा प्रवास वेळ कमी होणार असून, औद्योगिकसह इतर विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता आर.आर. हांडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, द्रुतगती मार्गाचे सर्व काही मंजूर झाले आहे. एक निविदा मंजूर झाली असून, ती इन्फ्रा समितीकडे जाईल. शिरूर ते संभाजीनगर हा ग्रीनफिल्ड व विद्यमान रस्ता हे पुढील टप्प्यातील कामांचे नियोजन आहे. शिरूर ते संभाजीनगर ग्रीनफिल्डच्या निविदा नव्या वर्षात निघतील, अशी अपेक्षा आहे.
पहिला टप्पा: पुणे ते शिरूर उड्डाणपूल मार्ग (इलेव्हेटड कॉरिडॉर)
दुसरा टप्पा: शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग
तिसरा टप्पा : पुणे ते शिरूर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग
विद्यमान रस्त्याबाबत काय?
छत्रपती संभाजीनगर-अहिल्यादेवीनगरमार्गे पुणे या विद्यमान मार्गाचे नूतनीकरण करण्यासाठी शासनाने १९ सप्टेंबर २०२४ रोजी अध्यादेश जारी केला. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यासह मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या हा रस्ता पूर्णत: खराब झाला असला तरी त्याचे दोन टप्पे पूर्णत: एमएसआयडीसीकडे हस्तांतरित झालेले नाहीत, असे एमएसआयडीच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे बांधकाम विभागालाच त्या रस्त्याची डागडुजी करावी लागणार असून, नाशिक विभागाने ३५ कोटींचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. सध्या या रोडवरून पुण्याला जाताना १२-१२ तास लागत असल्याचा अनुभव प्रवासी सांगत आहेत.