शहरातील ३९ डांबरी रस्त्यांची निविदा रखडली; ३१ किमीसाठी ५७ कोटींचे अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 07:09 PM2021-08-28T19:09:11+5:302021-08-28T19:10:58+5:30

शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Tender for 39 asphalt roads in the city stalled; 57 crore budget for 31 km | शहरातील ३९ डांबरी रस्त्यांची निविदा रखडली; ३१ किमीसाठी ५७ कोटींचे अंदाजपत्रक

शहरातील ३९ डांबरी रस्त्यांची निविदा रखडली; ३१ किमीसाठी ५७ कोटींचे अंदाजपत्रक

googlenewsNext
ठळक मुद्देपॅचवर्कवर कोट्यवधींचा खर्चगणेशोत्सवात खड्ड्यांचे काय?

औरंगाबाद : शहरातील काही प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. महापालिकेने आपल्या निधीतून ३९ रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. ५७ कोटींचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले. मागील महिन्यातच प्रशासनाने लवकरच निविदाही प्रसिद्ध होणार असल्याची घोषणा केली. मात्र, ऑगस्ट महिना संपत आला तरी निविदा प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतर रस्त्याची कामे सुरू होण्याची शक्यता नाही.

शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कामासाठी निधी नसल्यामुळे महापालिकेने यापूर्वी राज्य सरकारकडे निधीची मागणी केली. राज्य सरकारकडून २७७ कोटी निधी मिळाला. या निधीतून ५८ सिमेंट आणि डांबरीकरण रस्त्यांची कामे करण्यात आली. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी रस्त्याच्या कामासाठी सरकारकडे निधी न मागता महापालिकेच्या निधीतून काही रस्त्याची कामे करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता महापालिकेच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी १०० कोटींची तरतूद केली.

सिमेंट रस्त्यांसाठी होणारा दुपटीचा खर्च आणि पर्यावरणावर त्याचा होणारा परिणाम लक्षात घेऊन प्रशासकांनी पहिल्या टप्प्यात ४० रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता रस्त्यांची निवड करून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता बी.पी. फड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ४० रस्त्यांची निवड करून त्याकरिता लागणाऱ्या ५७ कोटी १० लाख १४ हजार १५ रुपयाचे अंदाजपत्रक तयार केले. अंदाजपत्रकाला मंजुरीही देण्यात आली. मागील महिन्यातच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. ऑगस्ट महिना संपत आला तरी मनपाने निविदा प्रसिद्ध केली नाही.

पॅचवर्कवर कोट्यवधींचा खर्च
मागील दोन वर्षांमध्ये महापालिकेने पॅचवर्कची कामे केली नाहीत. त्यामुळे शहरातील काही रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. नागरिक, राजकीय मंडळींकडून सातत्याने ओरड होत असल्याने काही भागात पॅचवर्कची कामे सुरू करण्यात आली. पॅचवर्कवर पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवात खड्ड्यांचे काय?
महापालिकेतील सत्ताधारी दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाकडून खड्डे बुजवून घेण्याचे काम करून घेत असत. मागील दोन वर्षांपासून ही परंपरा खंडित झाली आहे. यंदा १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व खड्डे मनपा बुजविणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

Web Title: Tender for 39 asphalt roads in the city stalled; 57 crore budget for 31 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.