दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाखांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:38 IST2019-02-11T22:38:02+5:302019-02-11T22:38:46+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘विद्यार्थ्यांना दुष्काळ आला की फुकट खायची सवय लागते’ या कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या वक्तव्यामुळे सर्वत्र टीका आणि निषेध व्यक्त होत होता.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाखांची तरतूद
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘विद्यार्थ्यांना दुष्काळ आला की फुकट खायची सवय लागते’ या कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या वक्तव्यामुळे सर्वत्र टीका आणि निषेध व्यक्त होत होता.
बैठकीस कुलगुरू डॉ.चोपडे, प्रकुलगुरू डॉ़ अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ़ साधना पांडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ़ किशोर शितोळे, डॉ़ फुलचंद सलामपुरे, डॉ़ वाल्मीक सरवदे, संजय निंबाळकर, डॉ़ शंकर अंभोरे, डॉ़ राजेश करपे, डॉ़ नरेंद्र काळे, डॉ़ राहुल म्हस्के, डॉ़ वैशाली खापर्डे उपस्थित होते़ गेल्या काही दिवसांपासून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणाची व्यवस्था करण्याची मागणी होत होती. त्यासाठी विद्यापीठाने दहा लाख रुपयांची तरतूद करावी आणि उर्वरित रक्कम सामाजिक संस्थांकडून केली जाईल, अशी बाजू मांडण्यात आली होती. एकीकडे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनत असताना कुलगुरूंच्या वक्तव्याने सर्वत्र टीका केली जात होती. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर गंभीर चर्चा होण्याचे संकेत मिळाले होते. बैठकीत सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणाची परिस्थिती मांडली. अखेर सर्वांच्या एकमताने दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ निधीतून १० लाख रुपये खर्च करण्यासाठी मान्यता दिली. तीन ते चार महिने विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. बैठकीस डॉ. नरेंद्र काळे, डॉ. राजेश करपे, किशोर शितोळे, संजय निंबाळकर, डॉ. शंकर अंभोरे आदी उपस्थित होते.
संशोधकांचा पेच
पेट परीक्षा झाली. त्यावेळी एका-एका विषयासाठी दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी अर्ज केले. परंतु जागा ४० ते ६० असतात. पुणे विद्यापीठाने विद्या परिषदेत निवृत्तीनंतरही प्राध्यापकांना विद्यार्थी घेता येणार, असा निर्णय घेतला. आपल्या येथे पेट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत गाईड कमी आहेत. परंतु विद्यार्थ्यांना संशोधन करता आले पाहिजे. त्यामुळे आपल्याकडेही वयाची अट वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यास कुलगुरूंनी संमती दर्शविली. आगामी कालावधीत निर्णय घेऊन यूजीसीकडे हा विषय पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘नॅक’वरून गोंधळ
बैठकीच्या सुरुवातीलाच नॅकच्या तयारीचा आढावा घेण्यात आला़ १३ ते १५ डिसेंबरदरम्यान नॅकच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या रंगीत तालमीत राज्याबाहेरील दहा तज्ज्ञांवर किती खर्च झाला, त्यांनी दिलेला अहवाल, उपाययोजना यासंदर्भात सदस्यांनी विचारणा केली़ या समितीने सादर केलेला अहवाल दडवून ठेवला़ तो जोपर्यंत सदस्यांना देत नाही, तोपर्यंत बैठक होणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. माहिती लपविल्याने आक्षेप घेत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले़
आज विद्यापीठाचा अर्थसंकल्प
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आगामी वर्षातील अर्थसंकल्प नेहमीप्रमाणे ५३ कोटी तुटीचा असणार आहे़ हा अर्थसंकल्प मंगळवारी होणाऱ्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे़ सूत्रांच्या माहितीनुसार ३१२ कोटींचा हा अर्थसंकल्प असणार आहे.