उन्हाच्या तडाख्यात पोहण्याचा मोह झाला; तलावात उतरताच काही वेळातच तरुण बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:16 IST2025-05-06T12:15:26+5:302025-05-06T12:16:40+5:30
मिटमिटा येथील मनपा सफारी पार्कच्या मागील तलावात घटना

उन्हाच्या तडाख्यात पोहण्याचा मोह झाला; तलावात उतरताच काही वेळातच तरुण बुडाला
छत्रपती संभाजीनगर : मिटमिटा सफारी पार्कच्या मागील तलावात पोहायला गेलेला तरुण बुडाल्याची घटना साेमवारी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सय्यद जुबेर सय्यद कलीम (२०, रा. कासंबरी दर्गा परिसर, मिटमिटा) असे मृताचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा ४३ अंशाकडे गेला आहे. सोमवारीही शहराचे तापमान ४० अंशाच्या वर होते. यामुळे तलावात पोहायला जाण्यास तरुणांचा कल वाढला आहे. सय्यद जुबेर हा सोमवारी सायंकाळी मिटमिटा येथील मनपा सफारी पार्कच्या मागील तलावाकडे फिरायला गेला होता. तलावातील पाणी पाहुन त्यास पोहण्याचा मोह झाला. तलावात उतरल्यानंतर अवघ्या काही मिनिटात तो पाण्यात बुडाला.
या घटनेची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी विनायक लिमकर, जवान केतन गाडेकर, संकेत निकाळजे, आप्पासाहेब गायकवाड, जगदीश गायकवाड, गोपीचंद मोरे आणि वाहनचालक चंद्रसेन गीते यांनी घटनास्थळी धाव घेऊन जुबेरला बेशुद्धावस्थेत तलावातून बाहेर काढले. या घटनेची नोंद छावणी पोलिसांनी घेतली आहे. पोलीस हवालदार पी.ए. बावस्कर हे या घटनेचा तपास करत आहेत.