तापमानाचा कहर! छत्रपती संभाजीनगर ४२.५ अंश सेल्सिअसवर; पाच दिवसांत ३.१ अंशांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:55 IST2025-04-10T16:51:29+5:302025-04-10T16:55:02+5:30

दरवर्षी एप्रिलअखेर आणि वैशाखाच्या सुरुवातीपूर्वी एवढे तापमान असते. तो आकडा एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांतच गाठल्याने पुढील काळात काय होणार, याची चिंता आहे.

Temperature havoc! Chhatrapati Sambhajinagar at 42.5 degrees Celsius; 3.1 degrees rise in five days | तापमानाचा कहर! छत्रपती संभाजीनगर ४२.५ अंश सेल्सिअसवर; पाच दिवसांत ३.१ अंशांची वाढ

तापमानाचा कहर! छत्रपती संभाजीनगर ४२.५ अंश सेल्सिअसवर; पाच दिवसांत ३.१ अंशांची वाढ

छत्रपती संभाजीनगर : पाच दिवसांपासून शहर व परिसरावर सूर्य आग ओकत आहे. बुधवारने मागील चार दिवसांतील तापमानाचा उच्चांक गाठला. ८ एप्रिलपर्यंत मागील तीन दिवसांतील तापमानाचे रेकॉर्ड मोडल्यानंतर बुधवारी कमाल तापमान ४२.५ अंश सेल्सिअसपर्यंत नाेंदविले गेले. ९ अंशांनी तापमान वाढले, यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान आहे. 

दरवर्षी एप्रिलअखेर आणि वैशाखाच्या सुरुवातीपूर्वी एवढे तापमान असते. तो आकडा एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांतच गाठल्याने पुढील काळात काय होणार, याची चिंता आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून, पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी वाढ हाेत तापमान ४२.५ अंशांवर पाेहोचले, जे सरासरीपेक्षा जास्त होते. परिणामी, रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील रेकॉर्ड ब्रेक ४२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. वाढलेल्या तापमानामुळे रस्ते निर्मनुष्य होते. तापमान झपाट्याने वाढत असल्यामुळे दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तापमान वाढत जाईल...
एप्रिलअखेरचे तापमान पहिल्याच आठवड्यात झाले आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघतील. नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शासनानेदेखील तातडीने जनजागृती मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.
प्रा. किरणकुमार जोहरे, हवामानशास्त्रज्ञ

पाच दिवसांत ३.१ अंशांनी वाढले तापमान
तारीख- कमाल-किमान

५ एप्रिल - ३९.४ -२२.६
६ एप्रिल - ४०.२ -२३.३
७ एप्रिल- ४१.०- २४.१
८ एप्रिल- ४१.६- २६.२
९ एप्रिल- ४२.५ - २५.०

५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष
वाढत्या तापमानामुळे जि.प. सीईओ अंकित यांनी जिल्ह्यातील ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष स्थापन औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी एप्रिल ते जून या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होतो, तसेच त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. त्यातच आतापासूनच जिल्ह्यात कमाल तापमान वाढत चालल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

Web Title: Temperature havoc! Chhatrapati Sambhajinagar at 42.5 degrees Celsius; 3.1 degrees rise in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.