वाळू माफियांविरोधात तक्रारीस तहसीलदार ठाण्यात गेले, पोलिसांनी त्यांचीच जीप केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:13 IST2025-02-08T13:09:09+5:302025-02-08T13:13:04+5:30

वाळूमाफियांना पोलिसांचे अभय? महसूलची कारवाई चुकीची होती की, पाेलिसांनी तालुका दंडाधिकारी असलेल्या तहसीलदारांचे वाहन जप्त करणे योग्य होते, असा सवाल चर्चेत आहे.

Tehsildar went to complain about sand mafia; Police seized his jeep | वाळू माफियांविरोधात तक्रारीस तहसीलदार ठाण्यात गेले, पोलिसांनी त्यांचीच जीप केली जप्त

वाळू माफियांविरोधात तक्रारीस तहसीलदार ठाण्यात गेले, पोलिसांनी त्यांचीच जीप केली जप्त

छत्रपती संभाजीनगर : वाळूमाफिया दिवसेंदिवस कायद्याच्या सीमारेषा ओलांडत आहेत. वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा पकडून तहसील कार्यालयात घेऊन जाताना तहसीलदारांना अडवून शिवीगाळ करीत पथकाने ताब्यात घेतलेला हायवा पळविल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता पोलिस मेस, हडको परिसरात घडली. या प्रकरणी माफियांच्या विरोधात जिन्सी पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेले ग्रामीण तहसीलदार रमेश मुंदलोड यांचेच शासकीय वाहन पोलिसांनी जप्त केले, पळवून नेलेला हायवा मात्र शोधला नाही. यामुळे पोलिस आणि महसूल प्रशासनातील बेबनाव समोर आला आहे. महसूलची कारवाई चुकीची होती की, पाेलिसांनी तालुका दंडाधिकारी असलेल्या तहसीलदारांचे वाहन जप्त करणे योग्य होते, असा सवाल चर्चेत आहे.

विजय चौक परिसरात हायवा मुंदलोड व पथकाने ताब्यात घेतला. मात्र, दादा पवार या व्यक्तीने तहसीलदारांचे वाहन राेखले. तेथे मोठा जमाव आला. जमावात आणि महसूल पथकात बाचाबाची झाली; तर दुसरीकडे पोलिसांनीदेखील तहसीलदारांची तक्रार दाखल करून घेतली नाही. उलट तहसीलदारांचे वाहन जप्त केले. मुंदलोड यांनी शुक्रवारी दुपारी याचा अहवाल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना सादर केला. अहवाल सादर येईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना हे काहीच माहीत नव्हते. दरम्यान, हायवाचे मालक पवार यांनी आरोप केला की, हायवा रिकामा होता. मुंदलोड यांची ग्रामीण हद्द असताना ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटीसाठी ते शहरात कारवाई करतात. ते व त्यांचे सहकारी ६ रोजी मद्यपान करून आलेले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे होते.

गुरुवारी रात्री काय घडले?
तहसीलदार मुंदलोड गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास शासकीय वाहनाने घराकडे जात होते. विजय चौकात नंबरप्लेट नसलेला एक हायवा वाळूची चोरटी वाहतूक करताना दिसला. हायवाचालकाकडे रॉयल्टीच्या पावत्या नव्हत्या. तहसीलदार व पथकाने हायवा जप्त करून तहसील कार्यालयाच्या दिशेने जाताना हायवा पोलिस मेसजवळ येताच चालकाने दुसऱ्या दिशेने वळविला. तहसीलदारांनी पाठलाग करून हायवा थांबविला. त्यावेळी वाळूमाफियांनी तहसीलदार व पथकाला घेराव घालून शिवीगाळ केली. या गदारोळात हायवाचालक हायवा घेऊन पसार झाला. तहसीलदारांनी जिन्सी पोलिस ठाणे गाठले. तिथेही वाळूमाफियांचे काही साथीदार जमले. तहसीलदारांनी हायवाचालकाविरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेता त्यांचेच शासकीय वाहन जप्त केले.

पोलिसांनी सहकार्य केले नाही
हायवा पळवून नेल्याप्रकरणात जिन्सी पोलिसांनी सहकार्य केले नाही. उलट झडतीसाठी माझेच शासकीय वाहन जप्त केले. या प्रकरणाचा अहवाल मी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.
- रमेश मुंडलोड, तहसीलदार

दोषी पोलिसांवर कारवाई
तहसीलदारांचे शासकीय वाहन जप्त करणे गंभीर आहे. या प्रकरणी पोलिस उपायुक्तांशी केली असून दोषी पोलिसांवर त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे. पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्तांना या प्रकाराबाबत लेखी पत्र दिले जाईल.
- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

Web Title: Tehsildar went to complain about sand mafia; Police seized his jeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.