"मम्मी मुझे ट्यूशन नहीं जाना"; १० वर्षीय चिमुकलीवर शिक्षकाकडून अत्याचार, दीड वर्षापूर्वी गमावली होती नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:22 IST2025-06-16T14:20:11+5:302025-06-16T14:22:34+5:30
छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी क्लासेसच्या शिक्षकाने १० वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे समोर आलं आहे.

"मम्मी मुझे ट्यूशन नहीं जाना"; १० वर्षीय चिमुकलीवर शिक्षकाकडून अत्याचार, दीड वर्षापूर्वी गमावली होती नोकरी
Chhatrapati Sambhajinagar Crime:छत्रपती संभाजीनगर येथून अत्याचाराची हादरवणारी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपुंजीतील शिवनेरी कॉलनीत टॉपर क्लासेस या खासगी क्लासेसमध्ये १० वर्षीय विद्यार्थिनीवर ४५ वर्षीय शिक्षकाने वारंवार अत्याचार केला. ही धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. त्यानंतर संतप्त नातेवाइकांनी वासनांध शिक्षक सुभाष जाधव याला चोप दिला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
आईच्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी खासगी शाळेत इयत्ता चौथीत शिकते. दीड वर्षापासून पीडित मुलगी तिच्या दोन भावांसह सुभाष जाधवकडे रोज दुपारी ४ ते ६ पर्यंत ट्यूशनसाठी जाते. सुभाष जाधव ट्यूशनच्या बाथरूममध्ये घाणेरडे व्हिडीओ दाखवून मुलीवर वारंवार अत्याचार करत होता. आरोपी सुभाष जाधवने मुलीला धमकावले देखील होते. कोणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी त्याने दिली होती. मात्र मुलीने हा सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला आणि या अत्याचाराला तोंड फुटले.
शनिवारी ट्यूशनहून परतल्यावर मुलीने तिच्या आईला'मम्मी, मुझे कल से ट्यूशन नहीं जाना' असं सांगितले आणि ती रडू लागली. आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने सगळा प्रकार सांगितला. पीडितेच्या आईने दोन्ही मुलांना याबाबत विचारले तेव्हा त्यांनीही जाधव सर रोज तिला बाथरूममध्ये घेऊन जातात असं सांगितले. त्यानंतर महिलेले तिच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. संतप्त नातेवाईकांना सुभाष जाधवला पकडून बेदम चोप दिला ज्यामध्ये तो जखमी झाला.
दरम्यान, सुभाषला यापूर्वीही गैरकृत्यांमुळे एका शाळेतून काढून टाकले होते. तो दीड वर्षापूर्वी रांजणगाव शेणपुंजीतील एका खासगी शाळेत शिकवत होता. शाळेतून काढल्यानंतर त्याने टॉपर क्लासेस नावाने खासगी क्लासेस सुरू केले.