सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा कारमध्ये अत्याचार; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:25 IST2025-11-05T12:25:01+5:302025-11-05T12:25:22+5:30
शिक्षकासह कारचालकाला अटक; पोक्सोअंतर्गत विविध दहा गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल

सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा कारमध्ये अत्याचार; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : शिक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर शिक्षकानेच बळजबरी केली. दोन महिन्यांपूर्वी मुलीला शहरात रस्त्यात गाठून चालत्या कारमध्ये पुन्हा अत्याचार केला. शिक्षकाचा त्रास असह्य झाल्याने मुलीने कुटुंबाला हा प्रकार सांगितल्याने जवाहरनगर पोलिस ठाण्यात महेश विजय मखमले (वय ३४, रा. बुलढाणा) याच्यासह त्याचा कारचालक सिद्धेश्वर जायभाये याच्यावर पोक्सोअंतर्गत विविध दहा गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर यांनी सांगितले.
मूळ बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या सोळा वर्षीय पीडितेच्या वडिलांचे २०१३ मध्ये निधन झाले. तिची आई इतरांच्या शेतात काम करून तिचा सांभाळ करते. ‘नीट’च्या तयारीसाठी ती २०२४ पासून शहरात खासगी ट्युशनमध्ये आली. तेथे विजय मखमले शिक्षक असल्याने त्यांचा संपर्क आला. ऑक्टोबर २०२४ मध्ये मखमलेने तिच्या मोबाईलवर 'मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे' असे मेसेज पाठविण्यास सुरुवात केली. एप्रिल, २०२५ मध्ये ती महाविद्यालयात पेपर देत असताना मखमलेने तिला वर्गातून उठवून शाळेच्या दुसऱ्या खोलीत नेले. तुझा एमबीबीएसला क्रमांक लागला की तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणत विनयभंग केला. तेवढ्यात त्याचा नातेवाईक महेंद्र मखमले आल्याने महेशने मुलीला पाठवून दिले.
१९ ऑगस्ट रोजी मुलगी सायंकाळी भानुदासनगरच्या दिशेने पायी जात असताना महेशने तिचा पाठलाग करत रस्त्यात गाठत बळजबरी कारमध्ये बसवले. तिला पाण्यातून गुंगीकारक औषध दिले. सायंकाळी ७:३० वाजता तिला शुद्ध आली असता ती बीड बायपास परिसरात होती. तेव्हा तिला तिच्या शरीरावर चट्टे आढळून आले. शिवाय प्रचंड वेदना होत होत्या. आपल्यावर अत्याचार झालाय, याची जाणीव झाल्यानंतर तिने महेशला विचारणा केली. तेव्हा त्याने तिला धमकावत गुजरातला चलण्याचा हट्ट केला. तिने आरडाओरड केल्यावर कारमधून उतरवून दिले.
आत्महत्येचा प्रयत्न, मैत्रिणीने दिला आधार
घडलेल्या प्रकारामुळे मुलगी मानसिक तणावाखाली गेली. शिक्षकाच्याच अत्याचाराची तक्रार देण्याची तिची हिंमत झाली नाही. त्यामुळे तिने हॉस्टेलमध्ये झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचवेळी मैत्रिणीने तिला अडवल्याने हे प्रकरण उघडकीस आले. कुटुंबाला ही बाब कळाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर, निरीक्षक सचिन कुंभार यांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपींच्या अटकेचे आदेश दिले. उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी महेशसह चालक जायभायेला अटक केली.